आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरांना नोटिसा, कोणत्याही क्षणी पाडणार; प्रशासनाने केली कारवाईची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहराच्या विविध भागातील ११ अनधिकृत मंदिरांवर लवकरच हातोडा पडणार आहे. महापालिका प्रशासनाने यापूर्वी मंदिरांना नोटिसा बजावल्या असून त्यांची मुदत संपलेली अाहे. त्यामुळे ही मंदिरे कोणत्याही क्षणी पाडण्यात येणार आहेत. दरम्यान, उर्वरित आठ मंदिरांनाही प्रशासनाने नोटिसा बजावल्या अाहेत. मंदिरे पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येणार आहे.

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पहिल्या टप्प्यात ११ मंदिरे पाडण्यात येणार आहे. त्यापैकी मंदिरांवर कोणत्याही क्षणी हातोडा पडणार आहे. प्रशासनाने केलेल्या फेर सर्वेक्षणात पहिल्या टप्प्यातील २६ पैकी ११ मंदिरे अनधिकृत ठरवण्यात आली. पंधरा मंदिरांचे पुरावे प्रशासनाने ग्राह्य धरले. प्रशासनाने १९ नोव्हेंबरला मंदिरांना अंतिम नोटिसा बजावल्या होत्या. त्यापैकी मंदिरांनी पुरावे सादर केले. उर्वरित मंदिरांना बजावण्यात आलेल्या नोटिसांची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे या मंदिरांवर कोणत्याही क्षणी हातोडा टाकण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. उर्वरित मंदिरांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:हून ही मंदिरे पाडावी, यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. प्रशासनाने शहरातील एकुण ५७४ धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले. त्यात तब्बल ५७१ धार्मिक अनधिकृत असल्याचा अहवाल प्रशासनाने न्यायालयाला सादर केला आहे. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणावर सर्वच पक्षांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारवाईची वेळ येईल, तेव्हा प्रशासनाला मोठ्या दबावाला तोंड द्यावे लागणार आहे.

आंदोलनाची पुन्हा भीती
महापालिका प्रशासनाने धार्मिक स्थळांचे चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण केले असल्याचा आरोप सर्व पक्षांनी केला आहे. त्यामुळे मंदिरे पाडताना प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागणार आहे. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाली, तरी महापालिकेच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची भीती आहे. काही राजकीय कार्यकत्यांनी तसा इशाराही दिलेला आहे.

उद्याची महासभा गाजणार
काही दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी धार्मिक स्थळांचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे वाभाडे काढले होते. बुधवारी होणाऱ्या सभेत धार्मिक स्थळांचा मुद्दा गाजणार आहे. धार्मिक स्थळांबाबत चर्चा करण्यासाठी तातडीने विशेष महासभा बोलवा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ही सभा गाजण्याची शक्यता आहे.

यांच्यावर कोणत्याही क्षणी हातोडा
मारुती मंदिर, भिस्तबाग महाल
म्हसोबा मंदिर, बोल्हेगाव, गणेश चौक
गणेश मंदिर, बोहरी चाळ, स्टेशन रोड
या मंदिरांना बजावल्या नोटिसा
गणेश मंदिर, प्रोफेसर कॉलनी चौक
महादेव मंदिर, औसरकर मळा
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नानाजीनगर
शनी मंदिर, महात्मा फुले चौक
लक्ष्मीमाता मंदिर, सारसनगर
विठ्ठल रुक्मिणी मंदिर, केडगाव, मोतीनगर
मारुती मंदिर, अरणगाव रोड
देवी माता मंदिर, सिव्हिल हडको
बातम्या आणखी आहेत...