आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Bharat Jadhav Speak At Nagar On Act Play Contest

दिव्य मराठी संवाद: एकांकिका स्पर्धा कलाकारांचा मूळ पाया - भरत जाधव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एकांकिका स्पर्धा ही तर खरी एक चळवळ आहे. रंगभूमीच्या कलाकारांचा मूळ पाया हा एकांकिका स्पर्धा असते, हा मूळ पाया भक्कम असेल, तर जगातील कोणत्याही रंगभूमीवर कलाकाराला अडचण येत नाही, असे मत मराठी चित्रपटातील आघाडीचे अभिनेते भरत जाधव यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
अहमदनगर महाकरंडकसाठी नगरमध्ये जाधव आले असता त्यांनी "दिव्‍य मराठी'शी संवाद साधला. उद्योजक नरेंद्र फिरोदिया, संयोजक स्वप्नील मुनोत आदी यावेळी उपस्थित होते. जाधव म्हणाले, एकांकिका तसेच नाटकातील यश हे नेहमीच कलाकारांना नवीन शिकवते प्रोत्साहन देत असते. पूर्वी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांपुरत्या एकांकिका स्पर्धा सीमित होत्या. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. अनेक शहरांमध्ये आता या स्पर्धा होऊ लागल्या आहेत. ही बाब कलाकार म्हणून मला चांगलीच वाटते. अशा स्पर्धांमधून तरुण कलाकारांना काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे या स्पर्धा काही शहरापुरत्या मर्यादित राहता राज्यातील अन्य जिल्‍ह्यांतही या व्हाव्यात.

नगर सारख्या शहरात नाटकावर प्रेम करणारी मंडळी आहेत. मुंबई पुण्यात नाटकासाठी चांगले वातावरण आहे. तसेच वातावरण अन्य भागात निर्माण झाले पाहिजे.

एकांकिका स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील नवीन कलाकारांना संधी मिळते. यातूनच ग्रामीण भागातील कलाकार पुढे येतो. ग्रामीण भागातील कल्पना, आशय उत्तम असतात. एकांकिकेत भाग घेणारा कलाकार नाट्य क्षेत्रात येतो. रंगभूमीच्या सर्व अंगाची माहिती व्हावी, यासाठी अशा स्पर्धा झाल्या पाहिजे, एकांकिका स्पर्धेत विविध प्रकारची कला पाहण्यास मिळते, असेही जाधव यावेळी बोलताना म्हणाले.

शासनाच्या मदतीची का? अपेक्षा ठेवावी...
मराठीनाटकांना शासनाकडून मदत मिळत नसल्याबद्दल विचारले असता, मराठी नाटके करणाऱ्यांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा ठेवू नये, चांगल्या पद्धतीने काम केल्यास यश मिळतेच. िहंदी चित्रपटातील गुंतवणूकदार मराठी चित्रपटात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूक वाढल्याने मराठी चित्रपट आणखी ताकदवार होईल. त्याचबरोबर मराठी कलाकारांनाही चांगले पैसे मिळतील, असे जाधव यांनी सांगितले.