आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून साकारले आदर्श ग्राम, अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- हिवरेबाजार ग्रामस्थांनी 25 वर्षे अविरत प्रयत्न करून लोकसहभागातून हे आदर्शग्राम साकारले. स्वप्ननिर्मिती वास्तवात आणण्याचा प्रयत्न हा जगभरातील संवेदनशील नागरिकांसमोर आदर्श आहे, असे प्रतिपादन अभिनेते तथा स्वच्छतेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मकरंद अनासपुरे यांनी केले. हिवरेबाजार येथे पंचवीस वर्षांत ग्रामस्थांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला. लोकसहभागातून गरजेवर आधारित विविध विकास कामे केली. या कामाची पाहणी व माहिती अनासपुरे यांनी शनिवारी घेतली. त्यानंतर आयोजित ग्रामसभेत अनासपुरे बोलत होते. यावेळी आदर्शगाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, सरपंच सुनीता पवार, एस. टी. पादीर, दीपक पवार, अरविंद जगताप आदी उपस्थित होते.
अनासपुरे म्हणाले, गावातील कामे ही शासकीय योजनांतून चांगल्या प्रकारे राबवता येतात, त्याचे हे उदाहरण आहे. आज माणूस संवेदनहीन होत आहे. डार्विनच्या सिद्धांतानुसार माणसाला शेपूट होते. परंतु त्याचा वापर न झाल्याने ते आपोआपच गायब झाले. कदाचित मेंदू सगळ्यांनाच आहे, पण त्याचा वापर चांगला झाला नाही, तर माणसाचा मेंदूही भविष्यात नाहीसा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे आता अनेक पोपटराव पवार निर्माण होण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून पवार यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. चित्रपट पडद्यावरील आम्ही हीरो आहोत, पण ग्रामविकासाच्या पडद्यावरील पोपटरावांसारखी माणसे रिअल हीरो आहेत. मी देशातील बहुतेक गावे पाहिली तेथे औषधांऐवजी दारूची दुकाने पहायला मिळाली. सुविधांअभावी गावातील नागरिक शहराकडे स्थलांतर करीत आहेत. भविष्यकाळ बदलायचा असेल, तर सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी परोपकारी झाले पाहिजे. प्रत्येक भारतीयाने चांगल्या कामाच्या जाहिरातीबरोबरच कोणाचे जनसंपर्क अधिकारी व्हायचे हे ठरवावे, असे अनासपुरे म्हणाले.
कलावंतामधला माणूस दिसला
रुपेरी पडद्यावर दिसणारा अभिनेता हिवरे बाजार आल्यानंतर दिवसभर थांबून गावाची माहिती घेतली. दुपारी दोन वाजता आयोजित ग्रामसभेत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा करत असताना त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ अन् कलावंतामधील खरा माणूस पहायला मिळाला.