आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरची सांस्कृतिक चळवळ पोरकी झाली !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मराठी रंगभूमी, तसेच हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या निधनाने नगरची नाट्य व सांस्कृतिक चळवळ पोरकी झाली. नगरमध्ये जन्मलेल्या व नगरमध्येच अभिनयाचे प्राथमिक धडे गिरवणाऱ्या अमरापूरकर यांनी कलाक्षेत्रात चार-पाच दशके अधिराज्य गाजवले. साश्रू नयनांनी नगरकर त्यांना मंगळवारी अखेरचा निरोप देतील.
11 मे 1950 रोजी जन्मलेल्या अमरापूरकर यांनी नगर शहरातील रेल्वे स्टेशनजवळील नगरपािलकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. अहमदनगर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते नाटकांकडे आकर्षित झाले. प्रा. मधुकर तोरडमल यांच्या नाटकांच्या तालमी पहात अिभनयाचे धडे गिरवणाऱ्या अमरापूरकर यांनी पुढे नगरच्या नाट्य चळवळीसाठी भरीव योगदान दिले. पुढे व्यावसायिक नाटके व चित्रपटांसाठी ते मुंबईत स्थायिक झाले, तरी नगरशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले. चित्रपटसृष्टीत नाव व पैसा कमावला, तरी अमरापूरकर यांनी नगरच्या मातीशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही. नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयासाठी निधी मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. नगरला 83 वे नाट्य संमेलन घेण्यात त्यांचाच पुढाकार होता. मागील काही वर्षांपासून ते नगरच्या विद्यार्थ्यांसाठी वेध परिषद घेत. यानिमित्ताने अनेक दिग्गजांना त्यांनी नगरकरांशी संवाद साधण्यासाठी बोलावले.
अमरापूरकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच नगरसह जिल्ह्यावर शोककळा पसरली. चतुरस्त्र अिभनेता, संवेदनशील माणूस, तसेच सजग कार्यकर्ता म्हणून अमरापूरकरांची ओळख नगरकर कधीच विसरणार नाही. त्यांच्या जाण्याने नगरची सांस्कृतिक चळवळ पोरकी झाली आहे, अशी भावना अनेक मान्यवर व रंगकर्मींनी व्यक्त केली.
अमरधाममध्ये दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार
नगरचे भूमिपुत्र सदाशिव अमरापूरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (4 नोव्हेंबर) दुपारी एक वाजता अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील. तत्पूर्वी माणिक चौकातील अमरापूरकर वाड्यात सकाळी नऊ ते अकरापर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. अकरा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल. दुपारी एक वाजता अमरधाम स्मशानभूमीत या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. आधी सायंकाळी चार वाजता अंत्यविधी करण्याचे नियोजन होते. मात्र, मोहरमची विसर्जन मिरवणूक असल्याने या नियोजनात बदल करण्यात आला. प्रशासनाशी समन्वय साधत दुपारी एक वाजता अंत्यविधी करण्याचे ठरले. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पदाधिकारी, अमरापूरकर यांचे कुटुंबीय व मित्रमंडळींनी अंत्ययात्रेचे नियोजन केले आहे. अंत्यविधीसाठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत.