आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actors Dr. Amol Kolhe Rally At Ahmednagar,latest News In Divya Marathi

ही तर महाराष्ट्राच्या स्वाभि मानाची लढाई- अभिनेते डॉ. अमोल कोल्हे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विधानसभेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभि मानाची निवडणूक आहे. महाराष्ट्रातून भगवा खाली उतरला, तर आपल्यासारखे कपाळकरंटे कोणी नसेल, असे भावनिक आवाहन शिवसेनेचे उपनेते व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी केले.
नगर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारासाठी सावेडीतील भिस्तबाग चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर व शीला शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, मनोज दुल्लम, अनिल बोरुडे, विक्रम राठोड उपस्थित होते. कोल्हे म्हणाले, कोंडून मारायचा प्रयत्न केला, तर मांजरही नरडीचा घोट घेते. आम्ही तर शिवसेनेचे ढाणे वाघ आहोत. अठरापगड जातींना बरोबर घेत स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब शिवसेनेत आहे. राज्यात युतीची सत्ता होती, त्यावेळी पाच जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर होते. त्यानंतर या वस्तुंचे भाव आजपर्यंत स्थिर राहू शकलेले नाहीत. महाराष्ट्रावर आदिलशहा, कुतूबशहा अशा अनेक शहांनी आक्रमणे केली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता भाजपचे शहा शिवसेनेला उंदीर बनवण्याची भाषा करत आहेत. त्यांनी आधी स्वत:च्या चष्म्याचा नंबर तपासला पाहिजे. कारण शिवसैनिक उंदीर नसून ते ढाण्या वाघ आहेत. ते कधी फाडून खातील ते तुम्हाला कळणारही नाही. निवडणुकीबाबत अनेक ओपिनीयन पोल आले असले, तरी शिवसेनेचीच सत्ता येणार आहे. महाराष्ट्रभर मी ५८ सभा घेतल्या. प्रत्येक शिवसैनिकांच्या डोळ्यातील विश्वास पाहिला, तर महाराष्ट्रावर भगवाच फडकेल, असा विश्वास वाटतो, असे कोल्हे म्हणाले. प्रचाराचा धुरळा जेव्हा उडतो, तेव्हा कोणाचा चेहरा दिसत नाही. परंतु या निवडणुकीचे मोठे उपकार आहेत. खरे चेहरे समोर आले आहेत, अशी टीका कोल्हे यांनी नाव न घेता भाजपवर केली. आघाडी सरकारने राज्याला पंधरा वर्षे ओरबाडले. आताही त्यांनी ९९ चा जुनाच जाहीरनामा आणला. त्यामुळे या आघाडीचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.

मुंडे यांच्यानंतर कुणीच नाही
नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत सांगितले की, गोपीनाथ मुंडे असते, तर राज्यात मला सभा घेण्याची वेळच आली नसती. याचाच अर्थ मुंडे यांच्यानंतर राज्याचे नेतृत्व करू शकेल, असा एकही माईचा लाल नाही, असे कोल्हे यांनी सांगितले. मोदी यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात काही वावगे बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्याबद्दल मला आदर
सर्व सत्ता तुम्हालाच हवी, मग कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का, अशी टीका कोल्हे यांनी नाव न घेता जगताप कुटुंबावर केली. शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. मंदिरावरील कळसाप्रमाणेच माझ्या मनात त्यांचे स्थान आहे, परंतु कळसाच्या वर भगवा असतो, असे कोल्हे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
जनता आमिषाला बळी पडणार नाही
राठोड म्हणाले, फलक लावून शहराचा विकास होत नाही. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मतदारांना वाटलेले टीव्ही उचलून नेणाऱ्यांच्या आमिषाला यावेळी जनता बळी पडणार नाही. यावेळी भगवी दिवाळी साजरी होणार यात शंकाच नाही. अर्ध्या रात्री बोलवा, शिवसेना तुमच्या सेवेसाठी हजर राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.