आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुरी - स्त्री कितीही उच्च पदावर गेली, तरीही तिच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलत नाही. हे आपले दुर्दैव असून त्यामुळे महिलांनीच कोणत्याही क्षेत्रात काम करताना जबाबदारी ओळखून वागावे, असे मत प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री ‘माहेरची साडी’फेम अलका कुबल-आठल्ये यांनी मंगळवारी व्यक्त केले.
तालुक्यातील तांदुळवाडी येथे अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनप्रसंगी कुबल बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे होते. इंद्रायणी शिक्षण संस्थेचे संस्थापक भास्कर होन, उपसरपंच बाबासाहेब पेरणे, मुख्याध्यापक मोहनीराज होन, संजय पवार, मुखत्यार सय्यद आदींसह शिक्षक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
कुबल म्हणाल्या, शहरातील नागरिकांना ग्रामीण भागाची आवड असते. एकत्रित कुटुंब पद्धती चांगली असून प्रत्येकाने कुटुंबातील संस्कार कधीही विसरू नयेत. आपल्या संपूर्ण 28 वर्षांच्या कारकिर्दीत आपण एकूण 250 चित्रपटांत काम केले. मात्र, आपल्या शिक्षिका असणार्या आईने आपल्यावर घालून दिलेल्या आदर्शाचे आपण कायम पालन केले. कुटुंबातून आपणास नेहमी सहकार्य मिळाले. यशानंतर बहरलेले झाड हे झुकलेलं असते, हे सांगताना त्यांनी स्वत: प्रदर्शित केलेल्या चित्रपटासाठी प्रसिद्ध गायिका लता दिदी यांनी विनाअट गाणे गायल्याचे सांगितले. भारतीय संस्कृतीला व आपल्या आई-वडिलांनी कधीही विसरू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
यावेळी इंद्रायणी शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व शालेय स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार कुबल यांच्या हस्ते करण्यात आला. अलका कुबल यांना पाहण्यासाठी महिला वर्गाची मोठी गर्दी झाली होती.
कुबल यांच्या नृत्यास प्रेक्षकांची दाद
वार्षिक स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रमात ‘माहेरची साडी’ या चित्रपटातील ‘सासर कसं’ हे गाणे सादर करण्यात आले. हे गाण्यावर विद्यार्थिनी नृत्य करत असताना कुबल यांनाही नृत्य करण्याचा मोह आवरला नाही व त्यांनीही या मुलींसोबत ठेका धरला. त्यावेळी उपस्थित महिला व प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. आपल्या 20 वर्षांपूर्वीच्या आठवणींना यामुळे उजाळा मिळाल्याचे कुबल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.