आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्शगाव हिवरेबाजारची निवडणूक सहाव्यांदा बिनविरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिनविरोध सदस्य  पोपटरावपवार, रोहिदास पादीर, पोपट गिऱ्हे, अलका भालेकर, मंदाबाई ठाणगे, कुसुम ठाणगे, सुवर्णा ठाणगे. - Divya Marathi
बिनविरोध सदस्य पोपटरावपवार, रोहिदास पादीर, पोपट गिऱ्हे, अलका भालेकर, मंदाबाई ठाणगे, कुसुम ठाणगे, सुवर्णा ठाणगे.
नगर- आदर्शगाव हिवरेबाजार ग्रामपंचायतीने निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा याही वेळी कायम राखली. निवडणूक स्वार्थासाठी नाही, तर तत्वासाठी लढवली पाहिजे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मिळून निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला, असे या गावाचे नेते पोपटराव पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
पवार म्हणाले, हिवरेबाजार ग्रामपंचायतीची पहिली बिनविरोध निवडणूक १९६० मध्ये झाली. तेव्हापासून गावासाठी आतापर्यंत आलेला निधी त्याचा झालेला खर्च याची माहिती ऑनलाइन उपलब्ध करण्याचे काम सुरु आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या वेबसाइटचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. येत्या २३ जुलैला गावाच्या विकासाची संदेश यात्रा काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत हे विकासाचे मंदिर व्हायला पाहिजे. ग्रामसभेचे अस्तित्व ग्रामपंचायतीवर अवलंबून आहे. पुढील पाच वर्षांत शिक्षण, आरोग्य याला प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. प्राथमिक शिक्षण महाग होत चालले आहे. खासगी शाळा जिल्हा परिषद शाळा यांच्यात स्पर्धा वाढली आहे. हिवरेबाजारमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आम्ही वसतिगृह उभारणार आहोत. वसतिगृहामध्ये बाहेरची मुले येतील. पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी सेमी इंग्रजीसह मुलांना इंग्रजी बोलण्याचा क्लास सुरू केला आहे. या क्लासची निम्मी फी पालकांनी भरायची. कारण फुकट दिले, तर त्याचे महत्त्व राहात नाही. मुलांना खेळण्यासाठी दोन एकर जागेवर क्रीडांगण उभारण्यात येणार आहे, असे पवार यांनी सांगितले.

सततच्या ताणतणाव सहन करावे लागलेस की मुलांची शारीरिक क्षमता टिकूच शकत नाही. स्वयंपाकघरात फास्ट फूड नको, हा उपक्रम आम्ही गावात सुरु केला आहे. फास्ट फूडला बंदी आणता प्रबोधनाने त्याचे प्रमाण कमी केले जाणार आहे, असे पवार म्हणाले.
ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर पोपटराव पवार यांनी सोमवारी ग्रामस्थांसमवेत हात उंचावून आनंद व्यक्त केला.

बिनविरोध सदस्य
पोपटरावपवार, रोहिदास पादीर, पोपट गिऱ्हे, अलका भालेकर, मंदाबाई ठाणगे, कुसुम ठाणगे, सुवर्णा ठाणगे.
लोकशाही
बातम्या आणखी आहेत...