आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरिक्त सीईओ पळवाटा शोधत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेला मोठी परंपरा आहे. यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी काम करत नाहीत. त्यांच्याविषयी सदस्यांनीही तक्रारी केल्या आहेत. प्रत्येक बाबींत नियमावर बोट ठेवून काम केलेले, तर ही ग्रामीण विकास करणारी यंत्रणा चालणार नाही. कायद्याच्या चौकटीत काम करताना त्यातील पळवाटा शोधून ते काम करत नाहीत, म्हणूनच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली असल्याची धक्कादायक माहिती उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा परिषदेत अधिकारी पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केले, तरच ग्रामीण विकासाचा रथ यशस्वीपणे पुढे जातो. अधिकारी पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी बैठकांचेही आयोजन केले जाते. परंतु, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांच्यावर पदाधिकारी सदस्यांनी टीकेची झोड उठवली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा बुधवारी झाली. या सभेत डॉ. कोल्हेंवर विकासकामात खोडा घातल्याचा आरोप करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पदाधिकारी, सदस्य अधिकारी यांच्यातच विकासकामांच्या मुद्द्यावरून जुंपल्याने जिल्हा परिषदेत अस्वस्थता आहे. गुरुवारी अध्यक्ष गुंड यांच्या दालनात पत्रकारांनी अध्यक्ष उपाध्यक्षांशी चर्चा केली. नियमांच्या चाकोरीत राहून विकास कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्यातच उपाध्यक्षांनीच नियमातील पळवाटा शोधून काम करण्याचा सल्ला दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शेलार म्हणाले, जिल्हा परिषदेला मोठी परंपरा असून अधिकारी पदाधिकारी चांगले काम करत आहेत. म्हणूनच जिल्हा परिषदेला यश मिळत आहे. डॉ. कोल्हे वेगळेच नियम दाखवून अधिकारी पदाधिकाऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण करू पहात आहेत. त्यांच्याविरोधात यापूर्वी सदस्यांनीही तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या पद्धतीनुसार जिल्हा परिषदेचे कामकाज चालत नाही. पदाधिकाऱ्यांनी खातेप्रमुखांविषयी तक्रार केली नाही, पण याच अधिकाऱ्याविरोधात का तक्रार केली. कायद्यात काम करणे आवश्यक आहे, पण नियमावरच बोट ठेवून काम केले, तर ही यंत्रणा चालणार नाही. अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांना काही वेळा दोन पावले मागे घ्यावी लागतात; अन्यथा विकास होत नाही. दीडपट मंजुरी देण्याचा विषय असताना कोल्हे म्हणतात, निधी नसताना कशी मंजुरी देता येईल? कायद्यातही पळवाटा आहेत, पण कायद्यात काम करताना पळवाटा शोधून काम करायला हवे. यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे. विभागप्रमुखांनी फायल पाठवली, तरी डॉ. कोल्हे त्यावर त्रुटी शोधून परत पाठवतात. निधी अखर्चित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचीही टीका शेलार यांनी केली.

मार्च अखेरमुळे संताप
मार्चअखेर असल्याने नियोजित निधी अखर्चित राहू नये, यासाठी टेबलावर वेगाने फायली फिरवल्या जात आहेत. परंतु शेवटच्या टप्प्यातच त्रुटी काढून फायलींना ब्रेक लावला जात आहे. त्यामुळे सदस्य पदािधकारी संतप्त झाले आहेत. लाभार्थी वंचित राहू नये यासाठी डॉ. कोल्हे यांनी विलंब करू नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांकडून होत आहे.
अण्णासाहेब शेलार

फाईलींवर टिप्पणी
जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कोल्हे विविध फायली तपासताना फायलींवर टिप्पणी लिहितात. डॉ. कोल्हे यांच्याविषयी जिल्हा परिषद सदस्यांनीही तक्रारी केल्या आहेत, असे जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अध्यक्षांशी चर्चा करणार
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कोल्हे यांच्यासंदर्भात सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव घेतला. परंतु, मी स्थायी समितीच्या सभेला उपस्थित नव्हतो. यासंदर्भात अध्यक्ष मंजूषा गुंड यांच्याशी चर्चा करणार आहे. शैलेश नवाल, मुख्यकार्यकारी अधिकारी
बातम्या आणखी आहेत...