आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळ काढण्यासाठी "नियोजन'मधून निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ग्रामसेवकावर अतिरिक्त कामाचा भार असल्याने टेबलावर बसून अहवाल तयार केले जातात. त्यामुळे आवश्यक उपाय योजना करूनही त्याचा लाभ होत नाही. त्यामुळे प्रभाग समित्यांसह इतर बैठकांना सरपंचांबरोबरच सदस्यांनाही आमंत्रित करावे. पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी गाळ काढणे मोहिमेंतर्गत जिल्हा नियोजनकडून डिझेल खर्चासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी माहिती आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील वांबोरी गटात जिल्हा परिषद सदस्य अॅड. सुभाष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नळपाणी योजनांच्या दुरुस्ती देखभाल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार कर्डिले बोलत होते. यावेळी सभापती मंगला निमसे, उपसभापती मंदा डुक्रे, सरपंच उदयसिंह पाटील, पंचायत समिती सदस्य एकनाथ ढवळे, तालुका कृषी अधिकारी निशाधीन शेळकंडे, कृषी अधिकारी नामदेव रोकडे, मंडल अधिकारी गिरीश बिबवे, सर्कल सचिन आैटी, सुखदेव कुसमुडे आदी उपस्थित होते.
बैठकीत निकम यांनी शासनाच्या धोरणासंदर्भात सखोल माहिती देऊन तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. याप्रसंगी कर्डिले म्हणाले, सद्यस्थितीत जिल्ह्यातील ग्रामसेवकांकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने माहिती मागितल्यानंतर ग्रामसेवक टेबलवर बसून माहिती तयार करतात. पण तसे करता सरपंच सदस्यांना खरी परिस्थिती माहित असल्याने त्यांना विश्वासात घ्यायला हवे.
प्रादेशिक पाणी योजना यापूर्वीच जिल्हा परिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून हस्तांतरित करून घेतल्या आहेत. पण योजनेतील काही गावांनाच पाणी पुरवठा होतो, उर्वरित गावे केवळ योजनेत समाविष्ट असतात, प्रत्यक्षात त्यांना पाणीच मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायती पाणीपट्टी भरण्यास प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व वाड्या-वस्त्यांना पाणी मिळायला हवे, तसेच गाळ काढण्यासाठी निधीची अडचण असल्यास डिझेल खर्चासाठी जिल्हा नियोजनकडून तसेच लोकवर्गणीतून निधी उपलब्ध करण्यास अडचण येणार नाही. त्यानुसार प्रस्ताव सादर करावा, असेही कर्डिले यांनी सांगितले.
पाणी योजनांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात आयोजित बैठकीत बोलताना आमदार शिवाजी कर्डिले. समवेत डावीकडून सरपंच उदयसिंह पाटील, अॅड. सुभाष पाटील, सभापती मंगला निमसे आदी. छाया: पोपट पटारे.
शिवार फेरीचे आयोजन
जुनेपाझर तलाव, तसेच बंधाऱ्यांची सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषी, महसूल विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधींनी घाट गणपतीपासून शिवारफेरी काढली. या फेरीत मुलांनी तलाव, फाशीचा नाला, दत्तू राहाणे वस्तीपर्यंतच्या भागाची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये नव्याने चार बंधारे बांधण्यासाठी संधी जागा असल्याचे दिसून आले. त्यानुसार कृषी विभागाचे मंडल अधिकारी गिरीश बिबवे यांनी संबंधित नोंदी घेतल्या आहेत.
अधिका-यांनो हजर रहा
अॅड.सुभाष पाटील यांनी बैठकीत वांबोरी गटातील पाणी योजनांसह देखभाल दुरुस्तीच्या योजनांचा आढावा घेतला. पाणी नमुने तपासणीच्या मुद्द्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. प्रभाग समित्यांसह इतर महत्त्वपूर्ण बैठकांना महसूलचे तलाठी, सर्कल या अधिकाऱ्यांनी उपस्थित रहायला हवे. टंचाई निवारणार्थ उपाययोजनांसह टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या विषयासंदर्भात महसूलची भूमिका महत्त्वाची असल्याचे पाटील यांनी सांगितले.