आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांस्कृतिक: आदिती भागवत, मनीषा साठे स्वाती दैठणकर यांच्या नृत्याची मैफल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या आयएमएस व्हिडिओकॉन अॅकॅडमी अॉफ फाईन अॅण्ड परफॉर्मिंग आर्ट्सच्या पंधराव्या वर्धापनदिनानिमित्त १६ जानेवारीला सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगणा आदिती भागवत यांचा, तर १३ फेब्रुवारीला ख्यातनाम नृत्यांगणा मनीषा साठे स्वाती दैठणकर यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते यांनी दिली. हे दोन्ही कार्यक्रम सावेडीतील माउली सभागृहात सायंकाळी ते या वेळेत होतील.

आदिती भागवत यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांच्या मातोश्री रागिणी यांच्याकडून घेतले. घरातूनच संगीतमय वारसा त्यांना मिळाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांनी डॉ. रोशनकुमारी यांच्याकडून जयपूर शैलीतील कथ्थकचे धडे घेण्यास सुरूवात केली. नंदिता पुरी यांच्याकडूनही त्यांना नृत्याचे शिक्षण मिळाले. कथ्थक नृत्याचे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी अ. भा. गांधर्व महाविद्यालयात पूर्ण केले. नृत्याबरोबरच अभिनयाच्या क्षेत्रातही आदिती यांनी आपला ठसा उमटवला. "ट्राफिक सिग्नल' या हिंदी चित्रपटात, तसेच चालू नवरा भोळी बायको, डोंबिवली फास्ट, सुंबरान या मराठी चित्रपटात अवंतिका, कहानी घर घर की, एका पेक्षा एक या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. आदिती डान्स अॅकॅडमीच्या माध्यमातून त्या लोकनृत्याबरोबरच शास्त्रीय नृत्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतात.

ख्यातनाम नृत्यांगना गुरू मनीषा साठे यांनी कथ्थक नृत्याच्या प्रशिक्षणास पंडित बाळासाहेब गोखले यांच्याकडून प्रारंभ केला. नंतर ख्यातकीर्त नटराज पंडित गोपीकृष्णन यांचे शिष्यत्व त्यांना लाभले. १९७५ मध्ये त्यांनी मनीषा नृत्यालय चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. या संस्थेमार्फत त्या कथ्थकचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतात. सवाई गंधर्व संगीत महोत्सव, खजुराहो डान्स फेस्टिव्हल, लखनौ डान्स फेस्टिव्हलमध्ये कथ्थक सादर करून त्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कोरिओग्राफर म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळवला आहे. महाराष्ट्र स्टेट कल्चर अॅवॉर्ड आणि अल्फा अॅवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जपानी संगीतकार यासुहितो टाकिमोटो यांच्या समवेत मनीषा यांनी २० वर्षे काम केले. स्वीडन, अमेरिका, जपान, तसेच कॅनडात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.

वयाच्या तिसऱ्या वर्षी भरतनाट्यम नृत्यास प्रारंभ केलेल्या गुरू स्वाती दैठणकर यांनी सुरूवातीस गुरू सत्यनारायम आणि डॉ. कनकरेळे संुदरराजन गुरूजींकडून नृत्याचे शिक्षण घेतले. अ. भा. गांधर्व महाविद्यालयातून १९९७ मध्ये नृत्य अलंकार झालेल्या स्वाती यांनी १९८९ मध्ये नृत्य साधना संस्था स्थापन केली. एचएमव्ही सारेगमने राजस सुकुमार नावाची त्यांची भरतनाट्यमची पहिली व्हीसीडी २००४ मध्ये काढली. इंडियन डान्स फेस्टीव्हल (दिल्ली), शाकुंतल महोत्सव, पुणे महोत्सवमध्ये त्यांचे भरतनाट्यमचे कार्यक्रम झाले. सिंगापूर, थायलंड, अमेरिका, युरोप येथेही त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. नूपुर नाद ही त्यांची स्वत:ची निर्मिती असलेल्या कार्यक्रमाचे देश-विदेशात सादरीकरण झाले आहे.

आयएमसएस व्हिडिओकॉन अॅकॅडमी कथ्थक भरतनाट्य नृत्याचे प्रशिक्षण देते. तीन मुलींपासून सुरू झालेल्या या अॅकॅडमीच्या रोपट्याचे आता ३०० विद्यार्थिनींच्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. अॅकॅडमीच्या विद्यार्थिनींनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासमोर राष्ट्रपती भवनात कला सादर केली होती. प्रवेशिकांसाठी प्रा. ऋचा तांदुळवाडकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य माधवी सराफ-रावल यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...