आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी बड्या धेंडांना दणका !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- मागील साडेतीन वर्षांपासून प्रशासनाचे उंबरठे झिजवून निराश झालेल्या संपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांना आशेचा किरण दाखवणारी घटना मंगळवारी घडली. इतके दिवस पतसंस्थेला वाकुल्या दाखवणार्‍या थकीत कर्जदारांनी अवसायक मंडळाच्या जप्ती मोहिमेचा धसका घेत चार कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यासाठी त्यांनी मुदत मागितली आहे.
बहुचर्चित संपदा पतसंस्थेच्या अवसायक मंडळाचे अध्यक्ष तथा राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी कर्जदारांच्या जंगम मालमत्तेची जप्ती मोहिम राबवण्यात आली. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यापासून सुरुवात करत मंडळाने जप्ती मोहिमेचे गांभीर्य जाणवून दिले. बोराटे यांची पत्नी चैताली यांनी संस्थेकडून 6 लाखांचे कर्ज वाहनासाठी घेतले आहे. व्याजासह ही रक्कम 42 लाखांच्या घरात गेली आहे. तारण ठेवलेले बोराटे यांचे वाहन संस्थेने यापूर्वीच जप्त करून संस्थेच्या लालटाकी येथील कार्यालयाच्या आवारात ठेवले आहे.
शहरातील 7 कर्जदारांकडे जात मंडळाने वसुलीचा प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी जप्तीची कारवाई न करता सहकार्य करण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले. कारवाईचा धसका घेतलेल्या 32 कर्जदारांनी संस्थेच्या कार्यालयात धाव घेत कर्जाची परतफेड करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्याकडे चार कोटींचे थकीत कर्ज आहे. संबंधितांनी परतफेडीसाठी मुदत मागितली असून तशी तयारी मंडळाने दाखवली आहे. मंगळवारच्या घडामोडीमुळे ठेव परतीच्या ठेवीदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

संपदात ठेवी अडकलेल्यांनी जानेवारी 2010 पासून ठेव परतीसाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यानच्या काळात संस्थेचा संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे याच्यासह संचालकांना अटक व सुटकाही झाली. मात्र, ठेवीदारांच्या हाती छदामही पडला नाही. हक्काच्या ठेवींची प्रतीक्षा करत अनेक ठेवीदारांची इहलोकीची यात्राही संपली. प्रशासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजवून नैराश्याने घेरलेल्या ठेवीदारांनी राजकारण्यांसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाही साकडे घातले. पण सर्व बाजूने निराशा हाती पडलेल्या ठेवीदारांनी ठेवपरतीची आशाच सोडून दिली. ठेवीदारांचा सहभाग असलेले प्रशासकीय मंडळ, त्यानंतर उपनिबंधक कार्यालयाचे अधिकारी व कर्मचार्‍यांचा समावेश असलेल्या प्रशासकीय मंडळाने संस्थेचा कारभार तीन वष्रे बघितला. परंतु थकीत कर्जदारांनी त्यांना ठेंगा दाखवत वसुलीला खो घातला. कारवाईची भीतीच उरली नसल्याने हे चित्र निर्माण झाले.

उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी वसुलीला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या निर्णयाला विरोध करणार्‍या ठेवीदारांनी ठेवपरतीसाठी कोणताही निर्णय घ्या, असा पवित्रा घेत अवसायनाच्या निर्णयाला संमती दिली. त्यानुसार कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली ठेवीदार व उपनिबंधक कार्यालयातील कर्मचार्‍यांचा समावेश असलेले अवसायक मंडळ नियुक्त करण्यात आले. या मंडळाने 11 एप्रिलला संस्थेचा कारभार हाती घेतला. संस्थेच्या सर्व माहितीची पडताळणी करून 471 कर्जदारांना जंगम मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. वसुली करण्यासाठी 6 मेपासून मोहिम सुरू करण्यात आली आहे.