आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Administration Provide Water To Widelife Animals Through Only Two Tankers

प्रशासनातर्फे वन्यजिवांसाठी अवघे दोन टँकर..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- निसर्गातील पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात सैरावैरा फिरत आहेत. त्यांच्यासाठी वनविभागाने वनक्षेत्रात 118 पाणवठे बांधले आहेत, पण त्यात पाणी भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अवघे दोन टँकर दिले आहेत. त्यामुळे सर्व पाणवठे एकदा भरण्यासाठी महिन्याहून अधिक कालावधी लागणार आहे.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. टंचाईवर राज्यात सर्वाधिक खर्च नगर जिल्ह्यात झाला आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनल्याने शासनाने छावण्या सुरू केल्या. टँकरची संख्या 500 च्या पुढे गेली आहे. माणसे संघर्ष करून सुविधा मिळवतील, पण वन्यजीवांचे काय असा प्रश्न वन्यजीवप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वनविभागाने वन्यजीवांसाठी वनक्षेत्रात 118 पाणवठे बांधले आहेत. एका पाणवठय़ाची क्षमता सहा ते सात हजार लिटर आहे.

नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत व जामखेड या तालुक्यात टंचाईची तीव्रता सर्वाधिक आहे. झाडे सुकून गेल्याने सावली नाही, घशाला कोरड पडली तर जवळ पाणी नाही अशी अवस्था वन्यजीवांची झाली आहे. त्यामुळे हे प्राणी मनुष्यवस्तीकडे येत आहेत.

काही दिवसांपूर्वीच पाणी पिण्यासाठी केडगाव परिसरात आलेल्या काळविटाला रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसून प्राण गमवावे लागले होते. त्यामुळे वनक्षेत्राबाहेरही पाणवठे बांधावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पण हे पाणवठे बांधणार कोण हा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासनाने दोन टँकर देऊन वनविभागाकडे बोट दाखवले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी बारा पाणवठे बांधले आहेत. काही स्वयंसेवी संस्था व संघटनांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. तथापि, वनक्षेत्राबाहेर पाणवठे बांधण्यास जिल्हा प्रशासन तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पाणी भरण्यास विलंब
जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने पाणी भरण्यास विलंब होतो. पारनेर, पाथर्डी, टाकळी, संगमनेर व अकोल्यातील पाणवठे भरण्यात आले. उर्वरित पाणवठे भरल्यानंतरच टँकरच्या आवश्यकतेबद्दल अंदाज बांधता येईल. ’’यू. जी. कडलग, उपवनसंरक्षक
10 लाखांची तरतूद
वनविभागाने पाणवठे बांधले आहेत. त्यात टँकरने पाणी टाकण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत टँकरसाठी 10 लाख रुपयांची तरतूद केली आहे.’’ डॉ. सदानंद जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी
मोठे नुकसान
जर जिल्ह्याच्या विविध भागातील वन्य पशू व पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था झाली नाही, तर कधीही भरून न येणारे नुकसान होईल. याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घ्यायला हवी. ’’ पोपटराव खोसे, सदस्य, दक्षता समिती