आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅड. सुभाष पाटील भाजपच्या गोटात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काँग्रेसचे निष्ठावंत नेते अशी ओळख असलेले अ‍ॅड. सुभाष पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. वांबोरीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांचा हात हातात घेऊन त्यांना समर्थन दिले. मात्र, पक्ष प्रवेशाची इतक्यात घाई नाही, असे अ‍ॅड. पाटील यांनी स्पष्ट केले.
राहुरीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. या मतदारसंघातील वांबोरी ग्रामपंचायत अ‍ॅड. पाटील यांच्या ताब्यात असून ते या गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अ‍ॅड. पाटील यांनी रविवारी रात्री वांबोरीत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. सरपंच उदयसिंह पाटील, भय्यासाहेब तारडे, सुखदेव कुसमुडे, अ‍ॅड. तात्यासाहेब डोळसे, एकनाथ ढवळे, अशोक ढोकणे, भानुदास कल्हापुरे आदी यावेळी उपस्थित होते. अ‍ॅड. पाटील म्हणाले, आजपर्यंत घाटाखालच्या अनेकांचे काम केले. आता घाटावरच्यांचे काम करून पाहू. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या कर्डिले यांना या निवडणुकीत माझा पाठिंबा आहे. कर्डिले व मी एकाच गुरुचे चेले आहोत. राजकीय विचारांमुळे पक्ष वेगळे असले, तरी लोकांच्या कामाची तड लावणे हा समान दुवा आहे. जिरायत परिसराच्या वेदना ठाऊक असलेल्या कर्डिलेंचे काम कार्यकर्त्यांनीही करावे. कोणी काही म्हणत असले, तरी युती सरकारच्या काळात वांबोरी चारीचे काम मार्गी लागले. वांबोरी चारीच्या रूपाने गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभे आहे. जिरायत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे कम करणाऱ्या मुंडे यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी यावेळी कार्यकर्त्यांनी कर्डिलेंचे काम करावे, असे पाटील यांनी सांगितले.
राजकारणासाठी पाटलांचा वापर केला
अभ्यासू आणि प्रश्नांची जाण असूनही अ‍ॅड. पाटील यांना सातत्याने डावलण्यात आले. राहुरीत विकास मंडळ त्यांच्यामुळे उभे राहिले हा इतिहास आहे. काँग्रेसचे काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या राजकारणासाठी पाटलांचा वापर केला, अशी खंत अनेक कार्यकर्त्यांनी बैठकीत बोलताना व्यक्त केली.