आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामाचे नाव घेणार्‍या भाजपात तप व्यर्थ - अ‍ॅड. प्रताप ढाकणेंची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - दिलीप गांधींच्या उमेदवारीवर आक्षेप घेऊन भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार्‍या अँड. प्रताप ढाकणे यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. बारा वर्षे भाजपची कार्यपद्धती जवळून पाहिली. रामाच्या नावाने चालणार्‍या पक्षात एक तप व्यर्थ गेले. आता शरद पवारांच्या सान्निध्यामुळे वनवास संपणार आहे. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

संस्कार भवनात ढाकणे यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर इरादा जाहीर केला. मंगळवारी पवारांच्या नियोजित पाथर्डी दौर्‍यात ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. ते म्हणाले, भाजपमध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांपुढे अडचणी वाढवण्याचे काम चालू आहे. ओढा आणि पाडा या नीतीत दंग पक्षात घुसमट झाली. कार्यकर्त्यांना न्याय व प्रश्नांची तड लावण्यासाठी पूर्ण विचाराअंती पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. मोदी यांना पंतप्रधान करण्याचा कांगावा होत असला, तरी खरा निर्णय वेगळाच होणार आहे. पवार हेच नेतृत्व करून देश व राज्याला महासत्ता बनवू शकतात. त्यामुळेच आपण अनेकांचे निमंत्रण धुडकावून राष्ट्रवादीला पसंती दिली. मंगळवारी वीर सावरकर मैदानावर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

पक्षासमोर ठेवल्या अटी
अँड. प्रताप ढाकणे यांनी मधल्या काळात शरद पवार यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या. केदारेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य व विधान परिषदेचे प्रतिनिधित्व व कार्यकर्त्यांना सत्तेत सहभाग या प्रमुख अटी त्यांनी राष्ट्रवादीपुढे ठेवल्या. पक्षर्शेष्ठींनी चर्चा यशस्वी झाल्याचे संकेत दिल्यानंतर ढाकणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.