आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनकार्डवरील स्वस्त तूरडाळ शिजणार का? शंभर रुपये किलोची डाळ उपलब्ध नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार रेशनकार्डवर तूरडाळ देण्याचा गांभीर्याने विचार करत असले, तरी याबाबतचे अधिकृत आदेश अजून जिल्हा पुरवठा विभागाला मिळाले नाहीत. गेल्या वर्षीही राज्य सरकारने शंभर रुपये किलोप्रमाणे तूरडाळ देण्याची घोषणा केली होती. मात्र, सात महिने उलटूनही भाजपची शंभर रुपये किलोची डाळ ग्राहकांच्या स्वयंपाकघरात शिजली नाही. त्यामुळे आता रेशनकार्डवरची स्वस्त तूरडाळ शिजणार का, याबाबतही साशंकता आहे. दरम्यान, नगर जिल्ह्याला हजार टन तूरडाळ मिळणार असून, सुमारे सात लाख रेशनकार्डधारकांना एक किलो याप्रमाणे ती वितरीत करण्याचे प्रस्तावित आहे.

नगरसह विदर्भ, खान्देश मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. मात्र, गेल्या वर्षी या भागात कमी अवेळी झालेल्या पावसामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे बाजारात तुरीची आवक मंदावली. आवक घटल्याने तूरडाळीचे भाव गगनाला भिडले होते. मागील वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किरकोळ बाजारात तूर डाळीचे भाव २०० रुपये किलोवर गेले होते.

राज्य सरकारने १४ ऑक्टोबरला तूरडाळीचे भाव नियंत्रित करण्यासाठी डाळीच्या साठ्यांवर मर्यादा घातली. महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद या क्षेत्रात तूरडाळीचा किती साठा ठेवायचा, हे निश्चित करण्यात आले. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन भाव कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शंभर रुपये किलो दराने तूर डाळ देण्याचे जाहीर केले. मात्र, भाजपची शंभर रुपये किलोची तूर डाळ ग्राहकांपर्यंत पोहोचलीच नाही. खुद्द विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना शंभर रुपये किलो दराने तूर डाळ मिळत नसल्याचा अनुभव आला.

आता पुन्हा सरकारने रेशनकार्डवर तूर डाळ देण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला तूर डाळ उपलब्ध करुन देण्यासाठी साकडे घातले आहे. राज्य सरकार रेशनकार्डवर तूर डाळ देण्याच्या विचारात असले, तरी प्रत्यक्षात त्याचे लेखी तर सोडाच, पण तोंडीदेखील आदेश अजून पुरवठा विभागापर्यंत आलेले नाहीत. त्यामुळे रेशनकार्डवर ही स्वस्त डाळ मिळणार की नाही याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, जिल्ह्याला हजार टन तूर डाळ मिळणार असून, जून किंवा जुलैपासून तिचे वाटप केले जाणार असल्याचे समजते. त्यासाठी निविदाही काढण्यात येणार अाहे. मात्र, त्या कधी निघणार हे समजले नाही.

पुढे वाचा... दोन वर्षांपासून उत्पादनात घट, भाव १८० चे २०० रुपये किलो, सर्वसामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी घोषणा
बातम्या आणखी आहेत...