नगर - शहर सुधारीत पाणीपुरवठा योजनेंतर्गत (फेज टू) मुकूंदनगर भागात चार वर्षांपूर्वीच पिण्याच्या नवीन टाकीचे काम पूर्ण झाले. जलवाहिन्या टाकण्याचे कामही पूर्ण झाले, परंतु अद्याप ही टाकी कार्यान्वित झालेली नाही. मुकूंदनगर भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. टाकी जवाहिन्यांचे काम पूर्ण होऊनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
मुकूंदनगर उपनगरातील लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. या भागात फेज टू चे काम पूर्ण झाले असतानाही पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका प्रशासन जाणिवपूर्वक या भागाकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत. यासंदर्भात मुकूंदनगर विकास समितीचे अध्यक्ष अर्शद शेख, अशोक सब्बन, सलीम सहारा, वसीम शेख, इस्माइल शेख, खालीद शेख, इम्तीयाज शेख आदींनी महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तक्रार केली. फेज टू योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर झाला आहे. याेजनेचे काम अनेक वर्षांपासून धूळखात पडले आहे.
योजनेच्या कामावर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झालेला आहे. असे असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना स्वच्छ पुरेसे पिण्याचे पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे महत्त्वाकांक्षी पाणी योजनेचा बोजवारा उडालेला आहे. गेल्या सहा वर्षांपासून रखडलेले योजनेचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. मुकूंदनगर भागातील पाणीप्रश्न तातडीने सुटला नाही, तर प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदनानंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुकूंदनगर विकास समितीच्या वतीने देण्यात आला.