आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी गेल्यानंतर शिवसेनेचे सोमवारी उपोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष असताना जायकवाडीला पाणी सोडले जात असल्याच्या निषेधार्थ शिवसेना सोमवारी (९ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे शशिकांत गाडे यांनी दिली. पाणी सोडल्यानंतर आठवडाभराने शिवसेना हे आंदोलन करत आहे.

निवेदनात म्हटले आहे, ब्रिटिशकाळात नगर जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागाला आधार देण्यासाठी भंडारदरा धरणाची निर्मिती झाली. असाच दृष्टिकोन ठेवून मुळा धरण बांधले गेले. मराठवाड्यापेक्षा नगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे लक्षात घेऊनच ही धरणे बांधण्यात आली. पिण्याच्या पाण्यासह दुष्काळी भागाला सिंचनाचा लाभ मिळण्याच्या उद्देशाने धरणांची निर्मिती झाली. २००५ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने समन्यायी वाटप हा जाचक कायदा केला. या कायद्यामुळे जिल्ह्यावर मोठा अन्याय होत आहे. या कायद्यामुळे हक्काचे पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागते.

अत्यल्प पावसामुळे यंदा पिण्यासाठीही पाणी कमी पडण्याची शक्यता असताना समन्यायी धोरणाच्या नावाखाली मराठवाड्याला पाणी सोडण्यात आले. वास्तविक जायकवाडीत वर्षभर पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा शिल्लक असतानाही पाणी सोडले गेले. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली उद्योग कृषी सिंचनाला पाणी जाणार असेल, तर शिवसेना त्याला तीव्र विरोध करेल.

पाण्याचे स्त्रोत नैसर्गिक परिस्थितीचा कोणताही विचार करता जायकवाडी धरणाची निर्मिती करण्यात आली असून जिल्ह्याच्या हक्काचे जायकवाडीला जाणारे पाणी त्वरित थांबवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती खेवरे गाडे यांनी निवेदनात दिली आहे.

अन्यायकारक अधिनियमच रद्द करा...
महाराष्ट्रजलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ च्या कलम १२ मधील समन्यायी पाणीवाटपाच्या चुकीच्या धोरणामुळे नगर जिल्ह्यावर सर्वाधिक अन्याय होत आहे. या धोरणामुळे नगर जिल्ह्याचे वाळवंट होण्याकडे वाटचाल सुरू आहे. शेतकरी, शेतमजूर उद्ध्वस्त होऊन आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर आणणारा हा अधिनियम रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
बातम्या आणखी आहेत...