नगर- राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, प्रकल्पग्रस्तांची रखडलेली भरती यासंदर्भात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या दालनात पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, तसेच प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्याच्या आत मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक उत्तम कदम यांनी दिले. या आश्वासनानंतर संभाजी ब्रिगेडने गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन गुरुवारी (13 फेब्रुवारी) सायंकाळी स्थगित केले. बैठकीत विद्यापीठाच्या प्रश्ना संदर्भात योग्य निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडतर्फे देण्यात आला.
संभाजी ब्रिगेडने विविध प्रसंदर्भात 11 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले होते. संशोधन सहायकपद भरतीत गैरव्यवहार झाल्याचे कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडून करण्यात आलेल्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे यांच्यावरही या अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. हा अहवाल स्वीकारून कुलगुरुंना पदमुक्त करण्याची मागणी ब्रिगेडने केली आहे, तसेच या भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलून विद्यापीठात कार्यरत असलेल्या अधिकार्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांची वर्णी लावण्यात आल्याचे पुरावे ब्रिगेडने दिले. पहारेकरी पदाच्या भरतीत मृत उमेदवाराची मुलाखत घेऊन गुणदान करणार्या निवड समितीवर फौजदारी दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी यासंदर्भात आंदोलकांशी मोबाइलवरून चर्चा केली. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक कदम यांनी गुरुवारी सायंकाळी आंदोलकांची भेट घेत प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न एक महिन्याच्या आत मार्गी लावण्याचे व कुलगुरुंच्या सीआयडी चौकशीबाबत कृषिमंत्र्यांच्या दालनात मुंबईला पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन दिले. दरम्यान, कृषिमंत्र्यांसोबतच्या बैठकीत याबाबत योग्य निर्णय झाल्यास पुन्हा आंदोलन करू, असे ब्रिगेडने म्हटले आहे. या आश्वासनानंतर कदम यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी उपोषण सोडले. यावेळी राहुरी पंचायत समिती सभापती शिवाजी गाडे, विद्यापीठ सदस्य अँड. तान्हाजी ढसाळ, देखरेख संघाचे अध्यक्ष अर्जुन पानसंबळ, अवधूत पवार, चंद्रभान ठुबे आदी उपस्थित होते.
कुलगुरुंनाही सूचना
ब्रिगेडच्या मागण्यांबाबत विद्यापीठ स्तरावर कार्यवाही करण्याच्या सूचना कृषी व संशोधन परिषदेने केल्या आहेत. तसेच या मागण्यांबाबत वस्तुनिष्ठ माहिती महासंचालकांना पाठवण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत. बैठक निश्चित करण्याबाबत कुलसचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीतून ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आंदोलकांना आहे.
आश्वासनावर विश्वास
विद्यापीठ प्रशासनाने धुळफेक चालवली आहे. प्रकल्पग्रस्तांना आश्वासनाचे गाजर दाखवत झुलवत ठेवण्यात आले. खुद्द कृषिमंत्री विखे यांनी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून तूर्तास आंदोलन मागे घेत आहोत. या बैठकीनंतरही कार्यवाही झाली नाही, तर आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे.’’ राजेश परकाळे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड.
शिक्षण व संशोधन परिषदेचे संशोधन संचालक उत्तम कदम यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे.