नगर - शहर विकासासाठी सुमारे सहाशे कोटींचे अंदाजपत्रक तयार करताना महापालिका प्रशासन पदाधिकाऱ्यांनी नगरकरांच्या सूचना मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. इतर महापालिकांप्रमाणे अंदाजपत्रकाच्या मंजुरी प्रक्रियेत नागरिकांच्या सूचना मागण्यांचा विचार होणे गरजेचे आहे. महापालिकेने मात्र दरवर्षीप्रमाणेच यंदाही नगरकरांना विचारताच अंदाजपत्रक तयार करण्याचा घाट घातला आहे. दुप्पट पाणीपट्टीसह काही नवीन कर नगरकरांवर लादण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने अंदाजपत्रकात ठेवला आहे.
मनपा प्रशासन २०१६-१७ या वर्षासाठी अंदाजपत्रक तयार करत आहे. मागील वर्षी प्रशासनाने तब्बल ५१७ कोटींचे अंदाजपत्रक महासभेसमोर सादर केले होते. यावर्षीदेखील सहाशे कोटींपेक्षा अधिक रकमेचे अंदाजपत्रक सादर होणार आहे. शासकीय नियमानुसार २० फेब्रुवारीपर्यंत अंदाजपत्रक मंजूर होणे बंधनकारक आहे. त्यासाठी प्रशासनाने अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. मागील वर्षीप्रमाणेच दुप्पट पाणीपट्टीसह काही नवीन कर लादण्याचा प्रस्ताव प्रशासनाने अंदाजपत्रकात ठेवला आहे. नागरी सेवांच्या शुल्कांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ सूचवण्यात आली आहे. ही वाढ सूचवताना शहरातील जागरूक नागरिक, ग्राहक संघटना, ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना, तसेच व्यापारी, नोकरदार, सर्वसामान्यांच्या सूचना मागण्यांचा विचार होणे गरजेचे होते.
देशाचे, राज्याचे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी विविध संघटनांची मते विचारात घेतली जातात. महापालिका मात्र नगरकरांना अंदाजपत्रकाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवत आहे. कोणते कर नागरी सेवांचे शुल्क वाढवायचे अथवा कमी करायचे याबाबत नगरकरांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. मनपाने यावर्षी तरी अंदाजपत्रक मंजूर करण्यापूर्वी आमच्या सूचनांचा विचार करून आम्हाला विश्वासात घ्यावे, अशी नगरकरांची मागणी आहे.
प्रशासनाने यावर्षी पुन्हा घरगुती अर्धा इंच नळजोडाची पाणीपट्टी दीड हजाराहून तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मनपाची अार्थिक घडी बसवण्यासाठी नगरकरांना बळीचा बकरा बनवण्याचाच हा प्रकार आहे. अनधिकृत नळजोडांकडे दुर्लक्ष करत उत्पन्नवाढीसाठी पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याचा (नगरकरांना विचारता) घाट प्रशासनाने घातला आहे.
महापौर म्हणतात प्रयत्न करू
अंदाजपत्रक तयार करताना अथवा त्यास अंतिम मंजुरी देताना नगरकरांची मते विचारात घेतली जातील का, असा साधा प्रश्न "दिव्य मराठी'ने महापौर अभिषेक कळमकर यांना विचारला. त्यावर ते म्हणाले, अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. अंदाजपत्रकाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू.