आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगरकर यांच्याकडून पक्षादेश धाब्यावर..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत सुंदोपसुंदी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात आलेल्या भय्या गंधे यांना स्वीकृत सदस्यपद द्यावे, असे स्पष्ट आदेश प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शहराध्यक्ष अँड. अभय आगरकर यांना फॅक्सद्वारे दिले. परंतु त्यांनी प्रदेशाध्यक्षांचे आदेश गुंडाळून स्वत:च स्वीकृत सदस्यपदासाठी अर्ज भरला, अशी माहिती देऊन पक्षादेश न पाळणार्‍या आगरकर यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी गंधे यांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्षांकडे केली. या सुंदोपसुंदीचा लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार आहे.
महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची निवड करण्यासाठी शनिवारी दुपारी एक वाजता विशेष सभा बोलावण्यात आली आहे. सभेत राष्ट्रवादीचे दोन, तसेच शिवसेना, काँग्रेस व भाजपच्या प्रत्येकी एका सदस्याची स्वीकृतपदी निवड होणार आहे. त्यासाठी चारही पक्षांच्या गटनेत्यांनी आपल्या सदस्यांची नावे बंद पाकिटात नगरसचिव मिलिंद वैद्य यांच्याकडे शुक्रवारी दाखल केली.
निवडणुकीत उमेदवारी डावलण्यात आलेल्या अनेकांना पक्ष व त्यांच्या नेत्यांनी स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द देण्यात आला होता. त्यात भाजपकडून प्रभाग 8 मध्ये निवडणूक लढवू इच्छिणार्‍या गंधे यांचाही समावेश होता. भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी गंधे यांना डावलून ऐनवेळी नितीन शेलार यांना उमेदवारी दिली. तरी देखील गंधे यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून निवडणुकीत पक्षाचे काम केले. प्रदेशाध्यक्ष फडणवीस व विरोधीपक्ष नेते विनोद तावडे यांनी त्याचवेळी गंधे यांना स्वीकृतपद देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार फडणवीस यांनी गुरूवारी (13 फेब्रुवारी) शहराध्यक्ष आगरकर यांना फॅक्स करून गंधे यांना स्वीकृतपद देण्याचा स्पष्ट आदेश दिला. परंतु आगरकर यांनी प्रदेशाध्यक्षांचा आदेश गुंडाळून ठेवत स्वत:च स्वीकृतपदासाठी अर्ज भरला. त्यामुळे पक्षादेश न पाळणार्‍या आगरकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी गंधे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष फडणवीस व विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. आदेश न मानणार्‍या आगरकरांवर आता काय कारवाई होते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
गंधे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, महापालिका निवडणुकीत आगरकर यांनी सर्व निष्ठावंतांना डावलून बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळे निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाला. आगरकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादीत जाऊन अपक्ष आमदारकी लढवली होती. परंतु त्यांची अनामत रक्कम जप्त झाल्याने त्यांनी पुन्हा भाजपचा मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे स्वत:बरोबर राष्ट्रवादीत गेलेल्या व पुन्हा भाजमध्ये परत आलेल्या लोकांना त्यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली. मात्र, त्यापैकी एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. यावरून त्यांच्या र्मयादा उघड झाल्या आहेत. आतापर्यंत शहरात भाजपचे संघटन मजबूत होते. परंतु आगरकर यांना शहराध्यक्षपद दिल्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. माजी शहराध्यक्ष र्शीकांत साठे यांच्या कार्यकाळात नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या 17 जागा निवडून आल्या होत्या. परंतु आगरकरांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला दहाचा आकडाही पार करता आला नाही.
या निवडणुकीत पक्षाने उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म देण्याचे अधिकार जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांना दिले होते, परंतु आगरकर यांनी हे अधिकार स्वत:कडे घेऊन चुकीच्या उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म दिले. आगरकर कधीच पक्षाशी एकनिष्ठ नव्हते आणि यापुढे देखील राहणार नाहीत. त्यांच्या आडमुठय़ा धोरणामुळे पक्षाला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी गंधे यांनी पक्षाकडे केली आहे.
ते फक्त शहराध्यक्षच
स्वत:ला शहर जिल्हाध्यक्ष म्हणवणारे आगरकर फक्त शहराध्यक्ष आहेत. त्यांना अद्याप शहर जिल्हाध्यक्षपद दिलेलेच नाही. तरीही पक्षसंघटनेत ते शहर जिल्हाध्यक्ष म्हणून वावरत आहेत. यावरून त्यांची नीतीमत्ता स्पष्ट व्हावी, अशी टीकाही गंधे यांनी केली आहे.
आगरकर ‘नॉट रिचेबल’
या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी अभय आगरकर यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
काळे यांच्या पराभवासही आगरकर जबाबदार
माजी उपमहापौर गीतांजली काळे यांनी निवडणूक लढवलेला प्रभाग आगरकर यांचा जुना प्रभाग आहे. काळे यांच्यामुळे त्यांचे प्रभागातील अस्तित्त्व धोक्यात आले होते. त्यामुळे आगरकर यांनी भविष्याचा विचार करून काळे यांच्या पराभवासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच काळे यांचा पराभव झाला. स्वार्थासाठी स्वत:च्याच पक्षातील उमेदवारांचा पराभव करण्याचा प्रयत्न करणार्‍या आगरकरांवर कारवाई करून अशा लोकांना योग्य संदेश देण्याची गरज आहे.’’ भय्या गंधे, कार्यकर्ते, भाजप.