आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी आगरकर यांचे नाव निश्चित, लवकरच होणार घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांच्या नावाला प्रदेश पातळीवरून हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यामुळे आगरकर यांची वर्णी लागणार हे निश्चित झाले आहे. येत्या तीन दिवसांत याबाबतची घोषणा होईल. प्रदेशकडून आलेल्या आदेशाप्रमाणे आपण काम करणार आहोत, असे आगरकर यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

जिल्हाध्यक्ष पदासाठी आगरकर व माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खासदार गोपीनाथ मुंडे यांचे सर्मथक समजले जाणारे ढाकणे यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रारंभी पुढे आले. नंतर मात्र त्यांचे नाव मागे पडले. भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची निवड जाहीर झाल्यानंतर प्रारंभी शहराध्यक्ष व नंतर जिल्हाध्यक्ष जाहीर केले जातील, असे संकेत प्रदेशपातळीवरून देण्यात आले होते. तथापि, प्रदेशाध्यक्षांची निवड होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटला, तरी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीला मुहूर्त मिळालेला नाही.

प्रदेश पातळीवरून आगरकर यांच्या नावाला नुकतीच सहमती मिळाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आगरकर यांची वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. ढाकणे यांना खासदार दिलीप गांधी यांच्या गटाकडून विरोध होत असल्याचे बोलले जाते.

शहराध्यक्षपदाची निवड मे महिन्यातच होणार होती. मात्र, कुणा एकाच्या नावावर पदाधिकार्‍यांमध्ये एकमत न झाल्याने ही निवड लांबणीवर पडली आहे. शहराध्यक्षपदासाठी ढाकणे व गांधी गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विद्यमान शहराध्यक्ष मिलिंद गंधे यांच्यासह जगन्नाथ निंबाळकर, अनिल गट्टाणी, सुनील रामदासी, नरेंद्र कुलकर्णी, बाबासाहेब वाकळे इच्छुक आहेत.