आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agitation In New York Of Dalit Killings In Javkheda, Ahmednagar

जवखेडे घटनेच्या निषेधार्थ न्यूयॉर्कमध्ये धरणे, दोनशे भारतीयांचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- अहमदनगर येथील जवखेडे हत्याकांड आणि दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय नागरिकांच्या वतीने साेमवारी सकाळी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात विविध क्षेत्रांतील आणि जाती-धर्मातील जवळपास २०० भारतीय नागरिक सहभागी झाले. हत्याकांडाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी संयुक्त राष्ट्र संघाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.

अमेरिकेच्या विविध शासकीय समित्यांवर सल्लागार म्हणून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दिलीप म्हस्के यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेतला. भारतीय नागरिकांनी न्यूयाॅर्कमधील भारतीय दूतावासापासून ते संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयापर्यंत शांतता फेरी काढली. दलित हत्याकांडाचा निषेध करणारे बॅनर्स घेऊन भारतीय नागरिक यात सहभागी झाले. या वेळी जवखेडे हत्यांकांडातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारत स्वतंत्र होऊन ६० वर्षे झाली तरी दलितांवर अन्याय होत आहे. यावर भारतीय मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अमेरिकेतील भारतीयांसोबतच काही अमेरिकन नागरिकांनीही यात सहभाग नोंदवला.

निवेदनात म्हटले आहे की, जवखेडे येथील घटनेच्या तीन आठवड्यांनंतरही पोलिसांनी दोषींवर कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिस दबावाखाली काम करीत आहेत. याप्रकरणी पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार समितीने या घटनेची दखल घेऊन भारत सरकारला निर्देश द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनातील मागण्या- महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा ‘दलित अत्याचारग्रस्त’ म्हणून नोंद घ्यावी, स्थानिक जिल्हा न्यायाधीश आणि मुख्य जिल्हा पोलिस अधीक्षक यांना त्वरित बडतर्फ करण्यात यावे, हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करावी, मृत जाधव यांच्या कुटुंबीयांना व गावातील सर्व दलितांना संरक्षण द्यावे, अहमदनगर येथे स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करावे, त्यावर १८० दिवसांत सुनावणी व्हावी, मृताच्या कुटुंबास त्वरित १० लाखांचा निधी द्यावा, संयुक्त राष्ट्राने ‘दलित अत्याचार’ यासंबंधी भारतीय सरकारशी त्वरित चर्चा करावी, वर्षाकाठी दलित अत्याचारच्या ४०,००० गुन्ह्यांची नोंद पोलिसांकडे होते. या मानवाधिकार उल्लंघनाला त्वरित आळा बसला पाहिजे, संयुक्त राष्ट्राने दलितांच्या मानवाधिकारांसाठी विशेष निधी जाहीर करावा.

प्रमाण वाढतेय
नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार प्रत्येक आठवड्यात १३ दलितांचे खून होतात. ५ दलितांची घरे जाळली जातात. ६ जणांचे अपहरण होते, तर २१ दलित महिलांवर बलात्कार होतो. या घटना कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी अशा घटनांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात ठेवली जावी.
-दिलीप म्हस्के, सामाजिक कार्यकर्ते, न्यूयॉर्क

मृताच्या कुटुंबीयांना त्वरित न्याय मिळावा. सर्व नागरिकांप्रमाणे आमच्या संरक्षण व सुरक्षेची खात्री देण्यात यावी. आम्ही केवळ आमचे मूलभूत संवैधानिक अधिकार मागतो आहोत.
-राजकुमार कांबळे, टेक्सास

ज्या विचारसरणीने हे हत्याकांड प्रेरित आहे, ते आकलनबाह्य आहे, हे आजच्या आधुनिक व सुसंस्कृत जगाशी विसंगत आहे. या विचारसरणीचा धिक्कार करतो.
- मिलिंद अवसरमोल, न्यू जर्सी
समाजातील पीडित घटकांना संरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या शासनाचा आम्ही निषेध करतो. दररोज, देशात अनेक जातीय अत्याचार होतात, पण ते कायम सामोरे येत नाहीत. आम्ही या घटना सर्व जगासमोर आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्था व वृत्त माध्यमांसमोर मांडण्याकरिता एकत्रित आलो आहोत. आज सर्वांनी एकसंघ होऊन जातीय अत्याचाराविरुद्ध उभे राहिले पाहिजे.
- संजय भगत, बोस्टन