आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agricultur Officers Against Using The Salt For Horticultur

मिठावर फळबागा जगवण्यास कृषी अधिकार्‍यांचा विरोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुष्काळाला इष्टापत्ती समजून फळबागा जगवण्यासाठी मिठाचा वापर शक्य आहे, असा दावा कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सबाजीराव गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. पारनेर तालुक्यात हा प्रयोग यशस्वी केला, पण कृषी विभागाचे अधिकारी मात्र या प्रयोगाला विरोध करीत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

गायकवाड म्हणाले, फळबागेसाठी दर 15 दिवसांतून एकरी 15 किलो मीठ वापरावे. हे मीठ पाण्याबरोबर देताना ड्रॉपमधून किंवा खोडाजवळ टाकावे. दुष्काळात हे प्रमाण दुप्पट करावे. खोडाजवळ टाकलेले मीठ हवेतील आद्र्रता शोषून घेते व नंतर मिठाचे पाणी होते. नंतर खोदून पाहिले असता खोडाजवळ चिखल तयार झालेला दिसतो. त्यामुळे दुष्काळात मीठ हे पाण्याला पर्याय म्हणून वापरता येते. पाणी नसताना झाडाला लागलेली फळे काढून टाकावीत, नाहीतर झाड स्वत: मरते, पण फळांना अन्न देते, असे त्यांनी सांगितले.

पारनेर तालुक्यातील रुईछत्रपती येथील संत्र्यांच्या बागांचे उदाहरण गायकवाड यांनी दिले. गेली दोन वष्रे तेथे पाऊस पडलेला नाही, तरीही मिठाच्या प्रयोगामुळे सर्व बागा जिवंत आहेत. कोणत्याही नवीन झाडाची लागवड करताना 1 वर्षापर्यंत 50 ग्रॅम, 2 वर्षांपर्यंत 100 ग्रॅम, 3 व 4 वर्षांपर्यंत 200 ग्रॅम, तर 5 वर्षांच्या पुढे 200 ग्रॅम मिठाचा वापर करावा, असे ते म्हणाले. जमिनीत मिठाचे घटक 3 वर्षे कार्यान्वित राहतात. झाडाच्या खोडाजवळ रिंग करून दर 15 दिवसांनी मीठ टाकत रहावे. ही झाडे जिवंत राहतात, असे त्यांनी सांगितले.

मिठाच्या शेतीच्या प्रयोगासाठी कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे राज्यभर प्रशिक्षण दिले जाते, पण राज्यातील कृषी अधिकारी याला विरोध करीत असल्याचे गायकवाड म्हणाले. मिठाच्या वापरामुळे जमीन क्षारपड होईल, अशी भीती त्यांना वाटते. तथापि, बारामती (जि. पुणे) तालुक्यातील वडगाव निंबाळे येथील जमीन मिठाच्या वापरामुळे सुपीक झाली आहे. शासनाने आमचा प्रयोग चुकीचा आहे, हे सिद्ध करावे. नाहीतर आडवे तरी येऊ नये, असे ते म्हणाले.