नगर- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटातील एका गावाची निवड करून सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीच्या मंगळवारी (10 जून) झालेल्या सभेत घेण्यात आला. समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
गटनिहाय एका गावाची निवड करून तेथील सर्व घरांमध्ये बायोगॅस सयंत्र उभारणी, अपारंपरिक ऊर्जा साधनांचा विकास, तसेच पर्यावरण संतुलित विकासाची कामे करण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या इतर विभागांची मदत घेऊन शेतकयांचे आर्थिक उत्पन्न व राहणीमान उंचावण्याबरोबर गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत मुक्त संचार गोठा, अझोला उत्पादन व बहुवार्षिक चारापिके या तिन्ही बाबी एकत्र करून गोवृंदावन ग्राम संकल्पना राबवण्याचे सभेत ठरले.
कामधेनू दत्तक ग्राम योजनेसाठी यावर्षी जिल्ह्यातील दीडशे गावांची निवड करण्यात येणार असून प्रत्येक गावासाठी 1 लाख 52 हजार 500 रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. वैरण विकास योजनेंतर्गत 40 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सभेला शारदा भिंगारदिवे, उषा मोटकर, निवास त्रिभुवन, कारभारी जावळे, समितीचे सचिव कृषी विकास अधिकारी विलास नलगे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे आदी उपस्थित होते.