आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारला जाणवेना दुष्काळाचे गांभीर्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा डिसेंबर महिन्यापासूनच जिल्‍ह्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. कमी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. विहिरींमधील पाण्याची पातळीदेखील कमी होऊ लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात टंचाईची स्थिती िनर्माण झाली आहे.टंचाईच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्‍हा प्रशासनाकडून जिल्‍हा नियोजन समितीची बैठक बोलावण्यात येते. या बैठकीचे अध्यक्ष हे पालकमंत्री असतात. राज्यात नवे सरकार येऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरीदेखील पालकमंत्र्यांची घोषणा न झाल्याने दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या नियोजन समितीच्या बैठका रखडल्या आहेत.

जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ४९७ मिलिमीटर आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील बहुतांशी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. उत्तरेतील शेती ही पाटपाण्यावर अवलंबून आहे. उत्तर जिल्हा हा बागायती म्हणून अोळखला जातो. गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळ जाणवला नाही. यंदा मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यंदा ऑक्टोबरअखेरपर्यंत ३८२मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी ५९१मिलिमीटर पाऊस झाला होता. कमी पावसामुळे डिसेंबर महिन्यापासूनच दक्षिण भागातील शेवगाव, पाथर्डी, कर्जत,जामखेड, श्रीगोंदे कायम दुष्काळी भागात दुष्काळजन्य स्थिती जाणवू लागली आहे. सध्या जिल्‍ह्यात टँकरची संख्या कमी असली तरी जानेवारी-फेब्रुवारीनंतर टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वीच्या दुष्काळात जिल्‍ह्यात तब्बल ७०० टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने ४०० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. तीन वर्षांपूर्वीच्या दुष्काळाच्या कालावधीत जिल्‍हा प्रशासनाने जनावरांच्या ४१६ छावण्या सुरू केल्या होत्या. त्यात २ लाख ६२ हजार जनावरे दाखल झालेली होती. त्याचबरोबर ११९ चारा डेपो सुरू करण्यात आले होते. चारा डेपो, छावण्या, चारा, टँकर व अन्य दुष्काळी उपाययोजनांवर तब्बल १ हजार कोटींचा खर्च झाला होता. यंदाही तीन वर्षांपूर्वीच्या दुष्काळाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यापासून दुष्काळाची िस्थती गंभीर होत आहे. दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून दुष्काळाच्या कालावधीत जिल्‍हा नियोजन समितीच्या बैठका घेतल्या जातात. या बैठका पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होतात. मात्र जिल्‍ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे नियोजन समितीच्या माध्यमातून बोलावण्यात येणाऱ्या दुष्काळी बैठका रखडलेल्या आहेत.
घोषणेनंतर बैठका
दुष्काळावर कायमस्वरूपीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. भविष्यात जिल्‍ह्यात पाणी, जनावरे व चारा याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जिल्ह्यातील दुष्काळाबाबत अधिवेशनात चर्चा करणार आहे. पालकमंत्री नसल्यामुळे नियोजन समितीच्या बैठका होऊ शकल्या नाहीत. पालकमंत्री घोषित होत नाही तोपर्यंत बैठका होणार नाहीत.''
विजय आैटी, आमदार
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
दुष्काळावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेथे टंचाईची अधिक स्थिती आहे त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील दुष्काळाबाबत नागपूर येथे सुरू असलेल्या िहवाळी अधिवेशनात जिल्‍ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ.''
दिलीप गांधी, खासदार