आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Agriculture Minister Radhakrishna Vikhe Comment On MLA Rathod

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संरक्षणाच्या नावाखाली शिवसेनेने मूर्ख बनवले; कृषिमंत्री विखे यांचे आमदार राठोडांवर टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- संरक्षणाच्या नावाखाली शिवसेनेने आतापर्यंत नगरकरांना मूर्ख बनवले. खरेतर त्यांच्यापासूनच लोकांना संरक्षणाची गरज आहे. नगरकरांना आता बदल हवा असून त्यासाठी त्यांची तयारी झाली आहे, असे सांगत महापालिका निवडणूक लढवण्यासाठी युतीने ठेकेदारांकडून पैसे गोळा केले आहेत, असा घणाघाती आरोप कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आमदार अनिल राठोड यांचे नाव न घेता सोमवारी केला.

वांबोरी चारीबाबत शासकीय विश्रामगृहात झालेल्या अधिकारी व पदाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर विखे पत्रकारांशी बोलत होते. या वेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, काँग्रेससाठी शहरात चांगले वातावरण आहे. नगरकरांना बदल हवा असून त्यासाठी त्यांची मानसिक तयारी झाली आहे. निवडणुकीत मी स्वत: लक्ष घालणार असल्याचे सांगत आमदार राठोड यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, जे संरक्षण देण्याच्या गोष्टी करतात, त्यांच्यापासूनच लोकांना संरक्षण हवे आहे. शहराला नेतृत्व नाही. अनेकांकडे क्षमता आहे, परंतु त्यांना संधी मिळत नाही. काही लोकांनी शहर विकासाचा मूळ अजेंडा बाजूला ठेवून वैयक्तिक अजेंडा पुढे केला आहे. संरक्षणाच्या नावाखाली नगरकरांना मूर्ख बनवले जात आहे. मनपाची निवडणूक लढवण्यासाठी युतीच्या सत्ताधार्‍यांनी आतापासूनच ठेकेदारांकडून पैसा गोळा करून ठेवला आहे. विविध योजनांसाठी शासनाकडून मिळालेल्या निधीतूनही काही रक्कम निवडणुकीसाठी बाजूला काढून ठेवण्यात आली आहे. काँग्रेस त्याची शहानिशा करणार आहे. त्यासाठी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. यापुढे मनपाला निधी देताना शासनस्तरावर पूर्ण शहानिशा करण्यात येणार असल्याचेही विखे यांनी सांगितले.

शहरातील वेगवेगळ्या संघटनांकडूनही विकासाच्या बाबतीत ठोस भूमिका घेतली जात नाही. राज्यात आघाडीचे सरकार असल्याने शहर विकासासाठी निधी मिळत नाही, असे आरोप होतात. परंतु त्यात काहीच तथ्य नाही. सरकार कोणाचेही असो, नगरसाठी मोठय़ा प्रमाणात निधी दिला जातो. तरीही शहराची अवस्था ‘जैसे थे’ आहे. आतापर्यंत इतर शहरांशी न् ागरची तुलना होत नव्हती, परंतु आता काळ बदलला आहे. विकासाच्या बाबतीत इतर शहरांशी तुलना होऊ लागल्याने दबाव वाढला आहे. युवा वर्गदेखील पुढे येत आहे, असे विखे म्हणाले.

मनपा निवडणुकीसाठी युतीने ठेकेदारांकडून पैसे गोळा केले
तुम्ही स्वत: काय केले?
ठेकेदारांकडून पैसे घेण्याची शिवसेनेची परंपरा नाही. दुसर्‍यांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्रात काँग्रेस काय करत आहे, याचे आत्मपरीक्षण विखे यांनी करावे. निवडणूक लढवण्यासाठी ते स्वत: 20 कोटी रुपये उधळतात. ते ते कोठून आणतात, याचा हिशेब कोणी द्यायचा? मी जरी 25 वर्षांपासून आमदार असलो, तरी महापालिका मात्र तितकी जुनी नाही. युतीवर आरोप करताना त्यांना विसर पडला असेल, की महापालिकेत पाच वर्षे आघाडीची सत्ता होती. त्यावेळी तुम्ही काय केले? स्वत:ला काही करता आले नाही, म्हणूनच ते दुसर्‍यांच्या नावाने ओरडत आहेत. मनपाची निवडणूक जवळ आल्यावरच त्यांना नगर शहरातील विकासकामे आठवली. या आधी ते काय करत होते ?
- अनिल राठोड, आमदार.

बिनबुडाचे आरोप
विखे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. युतीच्या माध्यमातून अशी चुकीची कामे होत नाहीत. आरोपात तथ्य असेल, तर त्यांनी ते सिद्ध करावे. मुळात मंत्रिपदावर असलेल्या विखे यांनी शहराबद्दल असे बिनबुडाचे आरोप करणे शोभत नाही. युतीच्या माध्यमातून अडीच वर्षांत शहरात अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी पाणी योजना, बालिकार्शम रस्त्याचे काम, शहरातील विद्युतीकरण, घरकुल योजना, कोठी ते यश पॅलेस रस्ता आदी मोठय़ा विकासकामांचा समावेश आहे. या निवडणुकीत विकासकामांच्या मुद्दय़ावर महापालिकेत पुन्हा युतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे विखे यांच्या आरोपांना काही अर्थ नाही.
- शीला शिंदे, महापौर.

कोकणातील पाणी वळवण्यासाठी प्रयत्न
नगर जिल्ह्यातील पाणीप्रश्नाबाबत विखे म्हणाले, हवामान बदलाचा परिणाम सर्वांनीच लक्षात घेतला पाहिजे. जायकवाडीत जाणारे पाणी मुद्दामहून कोणी अडवलेले नाही. जिल्ह्या-जिल्ह्यांत विनाकारण वाद तयार करण्याचा धंदा बंद झाला पाहिजे. कोकणात वाहून जाणारे शंभर टीएमसी पाणी गोदावरी खोर्‍यात वळवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पैशांची अडचण पुढे करत या प्रश्नाला बगल देण्यात येते, परंतु या प्रकल्पासाठी लागणारा 10 ते 15 हजार कोटींचा खर्च करण्यासाठी राज्य सरकारला काही अडचण असेल असे वाटत नाही. यासंदर्भात आपला पाठपुरावा सुरू असून अधिकार्‍यांशी चर्चा झाली आहे. याप्रश्नी मराठवाड्यातील शंभर टक्के लोक आपल्याबरोबर आहेत. आतापर्यंत अधांतरी चर्चा सुरू असल्याने पाण्याबाबत वाद निर्माण झाले. त्यामुळे सर्वांना एकत्र बोलावून बैठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.