आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाने उमेदवार ‘आयात’ केल्यास वेगळा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे/नगर - आमदार बबनराव पाचपुते यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देऊ नये, यासाठी श्रीगोंदे तालुक्यातील भाजपच्या निष्ठावंत निवडक कार्यकर्त्यांची रविवारी दुपारी श्रीगोंद्यात बैठक झाली. पाचपुते यांच्यासह अन्य कोणताही उमेदवार पक्षात आयात केल्यास निष्ठावंत कार्यकर्ते वेगळा विचार करतील, असा इशारा देत पक्षालाच आव्हान देण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात दुपारी ही बैठक झाली. भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. बैठकीस दादासाहेब ढवाण, सुवर्णा पाचपुते, संतोष लगड, बाळासाहेब महाडिक, राजेंद्र मोटे, बाळासाहेब हिरणवाळे, दत्तात्रेय हिरणवाळे, धनंजय औटी, भूषण बडवे आदी प्रमुख नेत्यांसह सुमारे दीडशे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना सर्वच वक्त्यांनी पाचपुते यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाविरुद्ध कडाडून हल्ला चढवला. वर्षानुवर्षे भाजपच्या कार्यकर्त्यांना छळणार्‍या व भाजप विचारसरणीला झोडपणार्‍यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश देऊ नये. तसे केल्यास कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल. अशा धक्क्यांमुळे पक्षासाठी सर्वस्वाची होळी करणारे कार्यकर्ते भविष्यात निर्माण होणार नाहीत. ज्यांना भाजपची विचारसरणी मान्य नाही, अशी मंडळी पक्षाचा ताबा घेतील. निष्ठावंतांनी केलेल्या त्यागाचे काय? असे अनेक प्रश्न स्थानिक नेत्यांनी बैठकीत उपस्थित केले.

आगामी निवडणुकीसाठी भाजपमधील कोणाही निष्ठावंतांना उमेदवारी द्या, बाहेरील उमेदवार आयात करू नका; अन्यथा वेगळा विचार करू, असा निर्वाणीचा इशारा देणारा ठराव बैठकीत सर्वसंमतीने संमत करण्यात आला. हा ठराव प्रदेश समितीकडे पाठवण्यात येणार आहे. स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांच्या या मागणीला प्रदेश समितीकडून कोणता प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाचपुतेंबाबत मंगळवारी चर्चा
नगर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई येथे मंगळवारी (19 आॅगस्ट) बैठक होणार आहे. या बैठकीत माजी आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांच्या पक्षप्रवेशाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे व आमदार पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत.’’
राम शिंदे, आमदार, तथा प्रदेश सरचिटणीस, भाजप.

विरोध संधीसाधू वृत्तीला
भाजपमध्ये एखाद्या नेत्याला प्रवेश द्यायचा असेल, तर पाच वर्षे त्याने निष्ठेने पक्षाचे काम करावे. यादरम्यान कोणतीही उमेदवारी मागू नये, सलग पाच वर्षे पक्षाची सेवा केल्यानंतरच उमेदवारीबाबत विचार केला जावा. भाजपचे वेगळेपण टिकवण्यासाठी हे आवश्यक आहे. नाहीतर भाजप व काँग्रेस संस्कृतीत काहीच फरक उरणार नाही. आमचा विरोध व्यक्तीला नव्हे, तर संधीसाधू वृत्तीला आहे.’’
राजेंद्र म्हस्के, जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा.

गेल्या वेळचा वाईट अनुभव
गेल्या वेळी श्रीगोंदे मतदारसंघातून भाजपने ऐनवेळी राजेंद्र नागवडे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली होती. नागवडे हे मूळचे काँग्रेसचे निष्ठांवत म्हणून ओळखले जातात. निवडणुकीपुरते ते भाजपमध्ये थांबले. पराभवानंतर पक्षाशी त्यांचा पुन्हा कोणताही संबंध आला नाही. त्यांनीही भाजपऐवजी काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याला पसंती दिली.

‘आयात’ नेते कोठे असतात?
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये येणारे, उमेदवारी मिळवणारे व अपयश आल्यास पुन्हा स्वगृही परतणारे किती अनुभव पक्षाने घेतले आहेत. निवडणुकीनंतरही पक्षाशी एकरूप काम करणारे आयात नेते किती आहेत? ज्यांना पाच वर्षे विरोध केला, निवडणुकीत त्यांचाच झेंडा खांद्यावर घेऊन फिरण्याची वेळ येणे, हे निष्ठावंतांसाठी दुर्दैवी आहे.’’
दत्तात्रेय हिरणवाळे, माजी तालुकाध्यक्ष, भाजप.