आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर : शिक्षकाने मुलींना झोडपले, ११ मुली जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वर्गातील गाेंधळ शांत करण्यासाठी शिक्षकाने छडीने केलेल्या मारहाणीत अकरा विद्यार्थिनी जखमी झाल्या. हा प्रकार बुधवारी दुपारी चार वाजता पारनेर तालुक्यातील कडूस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात घडला. मारहाण करणारा शिक्षक सुनील गायकवाड पसार झाला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कडूस विद्यालयातील नववीच्या वर्गामध्ये दुपारी गोंधळ सुरू होता. सुनील गायकवाड या शिक्षकाने मुलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण काही विद्यार्थ्यांनी त्यांची टिंगल केली. त्यामुळे गायकवाड यांनी चिडून विद्यार्थ्यांना छडीने मारहाण करण्यास सुरुवात केली. या वर्गात १२ मुले व ११ मुली असे एकूण २३ विद्यार्थी आहेत. शिक्षकांनी मारहाण करायला सुरुवात केल्यामुळे मुलांनी पळ काढला. त्यामुळे गायकवाड यांनी विद्यार्थिनींना कोंडून घेत छडीने मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुपा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

घाबरलेल्या विद्यार्थिनींचा आरडाओरडा ऐकून जवळच्या मंदिरातील ग्रामस्थ तेथे आले. त्यांनी वर्गाचा दरवाजा उघडून मुलींची सुटका केली. त्याच वेळी गायकवाड तेथून पसार झाला.
ही घटना समजताच मुलींचे पालक तेथे आले. काजल सुखदेव करंजुले, अक्षदा लक्ष्मण काळे व शारदा बाळू गावडे या तीन गंभीर जखमी विद्यार्थिनींना नगरच्या जिल्हा रुग्णालयात, तर इतर विद्यार्थिनींना सुपा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती समजल्यानंतर पंचायत समिती सभापती गणेश शेळके व शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींची विचारपूस केली. संतप्त पालकांनी याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी सुपा पोलिस ठाणे गाठले. घटनेचा निषेध म्हणून गुरुवारी शाळा व गाव बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. गायकवाड हा शिक्षक मूळचा शिरुरचा असल्याचे समजते. त्याच्या अनेक तक्रारींचा पाढा पालकांनी शेळके व लंके यांच्यासमोर वाचला.
बातम्या आणखी आहेत...