आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठलाग गवत्याचा; गवसला शहेनशहा; "ड्रॉप'च्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जबरी चोऱ्या करणाऱ्या कुख्यात दरोडेखाेर "गवत्या' येऊन गेला, अशी खबर मिळताच शहानिशा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस तेथे गेले. गवत्या समजून ज्याचा पाठलाग केला तो शहेनशहा जाफर काळे हा दरोडेखाेरही पोलिसांच्या हाती लागला. तो गवत्याचाच साथीदार. गवत्या मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. शहेनशहाच्या अटकेमुळे सोनई परिसरातील "ड्रॉप'च्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली फरारी आरोपींना पकडण्याची माेहीम सध्या सुरू आहे. अशा आरोपींची माहिती काढून त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस जंग जंग पछाडत आहेत. सोमवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक राहुल पवार, पोलिस दिगंबर कारखिले मल्लिकार्जुन बनकर हे सोनई परिसरात या कामासाठी आले. ड्रॉपच्या (स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटमार करणे) गुन्ह्यातील फरार आरोपी गवत्या (पूर्ण नाव माहीत नाही, राहणार पानसवाडी) याच्याबद्दल माहिती समजली. खात्री करण्यासाठी ते पानसवाडीत शिरले.

गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला काहीजण उभे होते. पोलिसांचे वाहन पाहून त्यांनी शेतात धूम ठोकली. पळून जाणाऱ्यांमध्ये गवत्याचा समावेश असल्याची शंका बळावल्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. गवत्या समजून ज्याचा पाठलाग केला तो पोलिसांच्या हाती लागला. पण चौकशीनंतर तो गवत्या नसून शहेनशहा ऊर्फ विशाल जाफर काळे (२२, पानसवाडी, ता. नेवासे) असल्याचे समोर आले. गवत्या मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. शहेनशहाची चौकी केली असता त्याने सोनई हद्दीत ड्रॉपचे पाच गुन्हे केल्याची कबुली दिली.

दरोड्याच्या गुन्ह्यात चोरलेला माल सोनई पेठेत राहणारा सराफ व्यावसायिक राधेश्याम चंपालाल वर्मा याला विकल्याची कबुली शहेनशहाने दिली. त्यामुळे वर्मालाही पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिराज पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पवार, पोलिस कर्मचारी कारखिले, बनकर, मधुकर शिंदे, विशाल अमृते, मच्छिंद्र बर्डे, महिला कर्मचारी सविता खताळ, भागवत, चालक सचिन कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना अटक करून अधिक तपासाकरिता सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
रॅकेट मात्र गुलदस्त्यात
सोनईहद्दीत ड्रॉपचा गुन्हा करणाऱ्या ठरावीक टोळ्या आहेत. शिंगणापूरला आलेल्या किंवा फोनवर संपर्क साधून स्वस्तात सोने गवसल्याची खात्री पटवून द्यायची. नंतर गळाला लागलेल्या इसमांना निर्जन ठिकाणी बोलवायचे, बेदम मारहाण करून त्यांच्याजवळचा ऐवज लुटायचा ही या टोळ्यांची मोडस ऑपरेंडी आहे. सोनई हद्दीत असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांकडून काही पोलिस कर्मचारी, स्थानिक पुढारी, राजकीय पदाधिकारी टक्केवारी वसूल करतात, अशीही उघड चर्चा आहे. त्याबाबत वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी गेलेल्या आहेत. पण, सखोल चौकशी झाल्यामुळे ड्रॉपचे गुन्हे करणारे रॅकेट अद्यापही गुलदस्त्यात आहे.

ड्रॉपचे गुन्हे उलगडणार?
नेवासेतालुक्यातील सोनई परिसर ड्रॉपच्या गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. शिंगणापूरला येणाऱ्या भाविकांना स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन बेदम मारहाण करणे, त्यांच्याजवळील मुद्देमाल लुटून पसार होणे ही ड्रॉपच्या गुन्ह्यांची खासियत आहे. पानसवाडी, घोडेगाव, झापवाडी, लोहोगाव, पांढरीपूल एमआयडीसी परिसरात हे गुन्हे घडतात. लुटले गेलेले लोक बदनामीच्या भीतीने पोलिसांत तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे ड्रॉपच्या गुन्ह्यांची नोंद होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. नोंद झालेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेचे प्रमाण कमी आहे. पण, आता शहेनशहाच्या अटकेमुळे बहुतांश गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.