आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahemadnagar Distric 16 Valleges In Water Meters Engine

जिल्ह्यातील १६ गावांनी बसवले जलमापक यंत्र, पाणी वितरणातील विषमता कमी होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाण्याचा अपव्यय टाळून योग्य पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्हा परिषदेने प्रायोगिक तत्त्वावर निवड केलेल्या गावांपैकी १६ गावांनी जलमापक यंत्र बसवून आदर्श निर्माण केला. या गावांतील ग्रामसेवक सरपंचांचा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार देऊन गौरव केला.
गावातील प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न असतो. त्यासाठी पाणीपट्टी आकारल जाते. परंतु जे जलवाहिनीच्या शेवटचे लाभार्थी आहेत, अशा कुटुंबांकडून मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मोटारींचा वापर करून पाण्याचा उपसा केला जातो. काहीजण पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त इतर व्यावसायिक कामासाठीही वापर करतात. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.
ज्या कुटुंबांना कमी दाबाने पाणी मिळते, अशा कुटुंबांकडून पाणीपट्टी भरण्यास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे योजना सुरळीत चालवून योग्य वसुली करण्यासाठी जिल्हा परिषदेने काही गावांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली. यापैकी १६ गावांनी प्रत्येक कुटुंबासाठी जलमापक यंत्र बसवले. त्यामुळे पाण्याच्या वापरानुसार अचूक पाणीपट्टी आकारण्यात येत आहे. त्यामुळे मोटारीने पाणी उपसा करणाऱ्यांचे प्रमाण कमी होऊन पाण्याचा दाब वाढल्याच्या प्रतिक्रिया ग्रामसेवक सरपंचांनी दिल्या.
या गावातील सरपंच ग्रामसेवकांना जिल्हा पाणी स्वच्छता मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गौरवण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती नंदा वारे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम आदी उपस्थित होते.

नवाल यांनी उपस्थित सरपंच ग्रामसेवकांकडून जलमापक यंत्राविषयक मते जाणून घेऊन संबंधित गावांचे अभिनंदन केले. पाणी स्वच्छता मिशन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांनी सांडपाणी व्यवस्थापन, तसेच जलमापक यंत्रे हगणदारीमुक्त गाव संकल्पनेबाबत मार्गदर्शन केले. नवाल यांनी भुयारी गटार योजना, जलमापक यंत्र, सांडपाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करून पुढील कालावधीत अधिक चांगले काम करण्याचे आवाहन केले.

गुंड म्हणाल्या, ग्रामीण भागातील जनतेने पाण्याची योग्य विल्हेवाट लावणे ही काळाची गरज असून त्यासाठी भूमिगत बंदिस्त गटार योजना राबवावी. सांडपाणीमुक्त ग्राम अभियानाद्वारे जिल्ह्यातील ५४ गावांची निवड करण्यात आली होती. जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील कुटंुबनिहाय जलमापक यंत्र बसवण्याचे नियोजन केले. हे यंत्र बसवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वसुली होण्यास मदत झाली आहे. याचा आदर्श इतर गावांनीही घेऊन जलमापक यंत्र बसवावीत, असे आवाहनही गुंड यांनी केले.

वॉटर मीटरसाठी निधीची अडचण
वॉटरमीटर बसवण्यासाठी ग्रामपंचायतीचा निधी अपुरा पडतो. त्यामुळे पंचायत समितीच्या मदतीने तेराव्या वित्त आयोगातील निधीचा उपयोग करून वॉटर मीटर बसवले. लहान कुटुंबांना कमी पाणी वापरल्याने २५ रुपये, तर जास्त पाणी वापरणाऱ्या मोठ्या कुटुंबांना ४०० रुपयांपर्यंत पाणीपट्टीची बिले येतात. नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती सभापती संदेश कार्ले यांनी दिली.