नगर - "आमच्याबाल्कनीतला आरसा बुलबुलला भारी आवडतो. तो दररोज तिथं येतो. आरशावरून घसरत जातो. बुलबुल सकाळी जर फिरकला नाही, तर सगळा दिवस सुनासुना जातो...' दिल्ली दरवाजाजवळील शमी गणपती मंदिरामागे देशमुख गल्लीत राहणाऱ्या अस्मिता शूळ आपला अनुभव सांगत होत्या.
नगरची वाडा संस्कृती प्रसिद्ध होती. आता वाड्यांची जागा अपार्टमेंटस््नी घेतली असली, तरी वाडा संस्कृतीत झाडे, पक्षी प्राण्यांविषयी जे प्रेम जपलं जात होतं, त्याचा विसर काहीजणांना अजून पडलेला नाही. हायटेक युगात वावरतानाही निसर्गाचं प्रेम नगरकरांनी जपलं आहे.
देशमुख गल्लीतील अनुसागर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शूळ यांच्या घराला दोन बाल्कनी आहेत. कुंड्यांमध्ये फुलझाडं औषधी वनस्पती त्यांनी लावल्या आहेत. पलिकडच्या वाड्यातील पिंपळ त्यांच्या गॅलरीजवळच आहे. त्यामुळे विविध प्रकारचे पक्षी त्यांच्या बाल्कनीत येतात. शूळ कुटुंबीय कुंडीतील सुगडात पाणी भरून ठेवतात. त्यामुळे झाडाला पाणी मिळतं आणि पक्ष्यांचीही तहान भागते. शिवाय बाजरी, फळांच्या फोडी आणि पोळीचे तुकडेही ते ठेवतात. पक्ष्यांसाठी ती मेजवानीच असते. त्यावर ताव मारण्यासाठी चिमणपाखरांबरोबर खारूताईही येते...
या सर्वांचा लळा अस्मिता आणि त्यांच्या परिवारातील सर्वांना लागला आहे. त्यांची पहाटच पक्ष्यांच्या किलबिलाटाने उजाडते. बुलबुल, शिंजीर, चिमण्या, कबुतरं हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यच झाले आहेत. त्यांच्याकडे येणारा बुलबुल आरशापुढे उभं राहून स्वत:चं प्रतिबिंब निरखत बसतो. तो आला नाही, तर शूळ परिवाराला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. "कबुतरांची पिल्लं तर आमच्या मुलांचे कबुदोस्त झाले आहेत. कोकिळेच्या कूजनाशी मुले जुगलबंदी खेळतात,' असं अस्मिता शूळ सांगतात.
घरीच तयार करतो रोपं...
^झाडांचापालापाचोळा, निर्माल्य ओला कचरा वापरून आम्ही कंपोस्ट खत तयार करतो. मी माझ्या सासूबाई तुळस, अबोली, लिंबू, गोकर्ण यांची रोपे तयार करतो. एकदा संक्रांतीला आम्ही वाणं म्हणून फुलझाडांची रोपं दिली होती. माझं पर्यावरणप्रेम मुलांमध्ये आणि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये चांगलंच रूजलं आहे.''
अस्मिता संतोष शूळ, शिक्षिका,नगर.