आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरे अपंग प्रमाणपत्र प्रकरण; आदेश देण्यापूर्वीच चौकशी अहवाल तयार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सावेडीतील आनंद विद्यालयावर प्रशासकाच्या नेमणुकीसाठी शिक्षणाधिकार्‍यांनी चौकशीचे आदेश देण्यापूर्वीच चौकशी अहवाल तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. कोणाच्या आदेशावरून चौकशी केली, असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामुळे चौकशी अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद अडचणीत आले आहेत.

गुलमोहर रस्त्यावरील आनंद विद्यालयात वैद्यकीय अधिकार्‍याची स्वाक्षरी व अपंगत्वाची टक्केवारी नमूद असलेली विद्यार्थ्यांची कोरी नमुना अपंग प्रमाणपत्रे आढळून आली होती. हे प्रकरण सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. याप्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी मुख्याध्यापिकेवर कारवाईचे आदेश दिले होते. तथापि, संस्थेत व्यवस्थापनाचा वाद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर औताडे यांनी मुख्याध्यापिकेला पुन्हा कामावर हजर होण्याच्या सूचना दिल्या होत्या. व्यवस्थापनातील वादाचा शाळेच्या कामकाजावर परिणाम होऊ नये यासाठी चौकशी अधिकारी नेमून शाळेवर प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे त्याचवेळी औताडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते. प्रशासक नियुक्तीसाठी विद्यालयाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांना 21 डिसेंबर 2012 रोजी देण्यात आले होते. हा अहवाल तयार झाला असून यात 11 डिसेंबर 2012 रोजी चौकशी करून अहवाल तयार केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आदेश देण्यापूर्वीच चौकशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात पालक आर. एस. दहातोंडे म्हणाले, आदेश मिळण्यापूर्वीच दोषी व्यक्तींशी चर्चा करून हा चौकशी अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी सय्यद यांचीच या प्रकरणात चौकशी करावी, अशी मागणी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.