आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटी प्रवास एक ते तीन रुपयांनी महागणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- येत्या 21 जानेवारीपासून शहर बससेवेच्या भाड्यांत एक ते तीन रुपयांनी वाढ होणार आहे. तोट्यात चाललेल्या एएमटीला त्यामुळे थोडा दिलासा मिळाला असला, तरी डेपोच्या जागेचा प्रश्न सुटला नाही, तर एएमटी सेवा बंद करण्याचा इशारा प्रसन्न पर्पलच्या व्यवस्थापनाने दिला आहे.

डिझेलच्या दरात वेळोवेळी झालेल्या वाढीच्या तुलनेत शहर बससेवेची भाडेवाढ झालेली नव्हती. शहर बससेवेला तोटा होत असल्याचे कारण पुढे करून व्यवस्थापनाने एएमटी सेवा बंद करण्याची नोटीस महापालिकेला दिली होती. गुरुवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढीच्या प्रस्तावाला 21 जानेवारीपासून मंजुरी दिली. तथापि, एएमटी व्यवस्थापनाच्या इतर मागण्या मान्य न झाल्यास ही बससेवा बंद होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वीच भाडेवाढीच्या प्रस्तावाला मनपा स्थायी समितीने मंजुरी दिली होती. परंतु हा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिक रणाकडे प्रलंबित होता. एएमटी सुरू झाल्यापासून आतापर्यंत सहावेळा डिझेलची दरवाढ झाली. महापालिकेने मात्र केवळ एक ते तीन रुपये भाडेवाढ करण्यास परवानगी दिली. एकीकडे डिझेलची दरवाढ, तर दुसरीकडे शहरातील विनापरवाना अँपेरिक्षाचालकांची मनमानी यामुळे एएमटी अडचणीत आली आहे. ही सेवा सुरू करताना झालेल्या करारात मनपाने एएमटीसाठी पार्किंग, कार्यालय व डेपोसाठी जागा देण्याचे मान्य केले होते. परंतु प्रत्यक्षात सेवा सुरू झाल्यावर मनपाने दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे मेंटनेस व पार्किंग आदींसाठी शहर बससेवेला दरमहा 60 हजार रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो.

एएमटीला 23 महिन्यांत सुमारे 75 लाखांचा तोटा झाला असून यापुढे एएमटीची सेवा देणे अशक्य आहे. बससेवेला होत असलेला तोटा विचारात घेऊन ही सेवा बंद करण्यासंदर्भात प्रसन्ना पर्पलने महापालिकेला नोटीस बजावली होती. गुरुवारी प्राधिकरणाने भाडेवाढीच्या प्रस्तावाला 21 जानेवारीपासून परवानगी दिली. त्यामुळे एएमटीचा तोटा काही प्रमाणात कमी होईल.

जागेबाबत आज बैठक
एएमटीला होणारा तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ गरजेची आहे. शहरातील विनापरवाना ऑटोरिक्षा व पॅगोचालकांवर महापालिका व आरटीओ कार्यालयाने कारवाई केल्यास प्रवासी वाढतील. बस पार्किंग व मेंटेनन्ससाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत शुक्रवारी (18 जानेवारी) आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. यात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.’’ दीपक मगर, व्यवस्थापक (एएमटी).

प्रमुख ठिकाणांचे बसस्थानकापासूनचे भाडे
ठिकाण जुने सुधारित
निर्मलनगर 11 रुपये 13 रुपये
निंबळक 13 रुपये 15 रुपये
आलमगीर 8 रुपये 9 रुपये
शिवाजीनगर 8 रुपये 9 रुपये
शाहूनगर ते 18 रुपये 21 रुपये इंजिनिअरिंग कॉलेज

अशी असेल भाडेवाढ
पहिल्या दहा किलोमीटरपर्यंतच्या विविध टप्प्यांसाठी एक रुपया, 10 ते 18 किलोमीटरपर्यंतच्या विविध टप्प्यांसाठी दोन रुपये, तर 18 किलोमीटरच्या पुढील विविध टप्प्यांसाठी तीन रुपयांची भाडेवाढ होणार आहे.