आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरला रेल्वे यार्डसाठी प्रयत्न सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर-पुणेरेल्वे सुरू करण्यासाठी नगरला रेल्वे थांबवण्याची (रेल्वे यार्ड) व्यवस्था होणे आवश्यक आहे. त्यासाठी मध्ये रेल्वेचे प्रयत्न सुरू अाहेत. नगरचा मालधक्का नारायण डोहो येथे हलवणे हा पहिला टप्पा असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर डी. के. शर्मा यांनी दिली. 
 
क्षेत्रीय रेल्वे सलागार समिती सदस्यांची बैठक मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी नगर जिल्ह्याचे प्रवासी आणि त्यांच्या समस्या, तसेच इतर मागण्या या समितीचे जिल्ह्यातील सदस्य हरजीतसिंह वधवा यांनी मांडल्या. 

शर्मा म्हणाले, नगर-पुणे रेल्वेसंदर्भात ३० हजार सह्यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. ही रेल्वे सुरू करण्याकरिता आणि शेवटचा थांबा म्हणून सध्या नगर स्थानकावर सोय नाही. तसेच दौंड-अहमदनगर सेक्शन अतिशय व्यग्र असल्याने सध्या ही रेल्वे लगेच सुरू होणे अवघड आहे. परंतु याबद्दल पुढे परीक्षण केले जात अाहे. 
 
याप्रसंगी वधवा यांनी शर्मा यांना मागच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा आणि त्यात दिलेल्या अाश्वासनांची माहिती दिली. मागील बैठकीत झेलम एक्स्प्रेसला एक कोच वाढवण्याचे अाश्वासन देण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात तसे काही झाले नसल्याचे वधवा यांनी सांगितले. नगर-पुणे रेल्वेमार्गादरम्यान दौंड स्टेशनला ‘बायपास’ करणाऱ्या कॉड लाईनकरिता पुणे जिल्हाधिकाऱ्यांंना जमिनीच्या हस्तांतरणाबाबतचे कागद देण्यात आले असून, लवकरच काम सुरू होण्याची त्यांनी ग्वाही दिली. कॉड लाइनसाठी सन २०१६-१७ मध्ये १९.९४ कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता आली असून लवकरच काम पूर्ण करण्याचे त्यांनी सदस्यांना आश्वासन दिले. नगरहून पुण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या विविध आठ गाड्यांचीही त्यांनी माहिती दिली. 
 
नगर रेल्वेस्थानकावर सीसीटीव्ही, निर्भया निधी अंतर्गत रेलटेल या कंपनीद्वारे लवकरच वायफाय सेवा सुरू करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. नगर येथे रेल्वे हॉस्पिटल आणि इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. 
 
प्रवाशांकडून पैसे उकळण्याची तक्रार 
सध्यारेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस आणि लांब पाल्यांच्या गाड्यांचे स्लीपर आणि रिझर्वेशनचे तिकीट चार्ट तयार झाल्यानंतर तिकीट खिडकीवर मिळत नाही. परंतु काही टी. सी. तिकीट खिडकीच्या येथे उभे राहून २५० रुपयांची ‘नो तिकिटा’ची पावती फाडून प्रवाशांंकडून पैसे उकळत असल्याचीे तक्रार शर्मा यांच्याकडे करण्यात आली. यात प्रवासी संबंधित पावती घेऊन स्लीपर डब्यात प्रवेश घेतो, परंतु त्याला बर्थ किंवा सीट प्राप्त होत नाही. यामुळे रेल्वे खिडकीवरील उत्पन्न कमी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी वधवा यांनी केली. यावेळी मध्य रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, तसेच रेल्वे सलागार समितीचे गुलबर्गा, पुणे, लातूर, मुंबई, ठाणे, कल्याण, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, भुसावळ, भोपाळ आदी ठिकाणाच्या ४२ सदस्यांनी आपापल्या भागातील रेल्वेसंदर्भातील प्रश्न मांडले. 
 
नगर-पुणे रेल्वे अधिकाऱ्यांच्या अजेंड्यावर 
नगर-पुणेरेल्वेची नगरकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ‘दिव्य मराठी’ने तिला बळ दिले. मुळात एखादा प्रश्न रेल्वेच्या हत्तीपेक्षा सावकाश हलणाऱ्या यंत्रणेच्या अजेंड्यावर जाणे अत्यंत अवघड असते. पण, नागरिकांच्या या चळवळीतील सक्रिय सहभागामुळे हा प्रश्न आता सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या अजेंड्यावर पोहोचणे, हे मोठे यश मानले जात आहे. रेल्वे यार्डाचा प्रश्न सुटल्यावर ही रेल्वे सुरू होण्याबाबत आता अधिकाऱ्यांनाही शंका नसल्याचे त्यांनी खासगीत सांगितले. 
 
नगर-बीड-परळी मार्गपूर्ण झाल्यावर नगरचे रेल्वे स्टेशन जंक्शन होणार आहे. कारण येथून रेल्वे सुटतील येथे शेवटचा थांबा म्हणून थांबतील. त्यामुळे नगरला रेल्वे यार्ड होण्याच्या दृष्टीने नारायण डोहो येथे नगरचा मालधक्का हलवण्याचे काम सुरू आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून नगर ते नारायण डोहोदरम्यान नियमित मालगाड्यांची वाहतूक सुरू झाली आहे. नारायण डोहो येथील स्टेशनवर उभी असलेली ही पहिली मालगाडी. 
बातम्या आणखी आहेत...