आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांची एएमटी अखेर आजपासून बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गेल्या अडीच वर्षांपासून नगरकरांच्या सेवेत असलेली शहर बससेवा (एएमटी) बंद करण्याच्या निर्णयावर ठेकेदार संस्था प्रसन्ना पर्पलने अखेर शनिवारी शिक्कामोर्तब केले. सेवा बंद करण्यासाठी दिलेल्या मुदतीच्या एक दिवस आधीच ही सेवा बंद करण्यात आली आहे. संस्थेने सर्व बस शनिवारी सायंकाळी पुणे रस्त्यावरील हॉटेल माईल स्टोन येथे हलवल्या आहेत.

महापालिका कार्यालयात आमदार अनिल राठोड व महापौर शीला शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीत एएमटीबाबत कोणताच निर्णय न झाल्याने संस्थेने सायंकाळी अचानक सर्व बस शहराबाहेर हलवल्या आहेत, तसेच चालक व वाहकांना दोन दिवसांत गणवेश जमा करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे सेवा बंद करण्याच्या निर्णयावर ठेकेदार संस्थेने शिक्कामोर्तब केले आहे. याबात ‘दिव्य मराठी’ने प्रसन्नाचे संचालक रोहित परदेशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, सेवा बंद करण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मनपाने सेवेत येणार्‍या अडचणींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला, आता सहकार्य करण्यास त्यांनी तयारी दाखवली, परंतु त्याचा काहीच फायदा नाही. सेवा सुरू ठेवण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले, तरी त्यांच्या अंमलबजावणीसाठी बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे होणारे नुकसान संस्थेला न परवडणारे आहे. इच्छा असूनही सेवा सुरू ठेवणे अशक्य आहे. मनपाने सध्याचा करारनामा रद्द करून नवीन सुधारित करारनामा तयार करावा, त्यात एएमटीसाठी आवश्यक सर्व सुविधांचा विचार झाला, तर आम्ही पुन्हा निविदा भरून सेवा देण्यास तयार असल्याचे परदेशी यांनी सांगितले. दरम्यान, रविवारपासून एएमटी बंद झाल्याने विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होणार आहे. एएटीने शहरात सुमारे 17 हजार प्रवासी जोडले होते. त्यात साडेतीन हजार विद्यार्थ्यांना स्मार्टकार्ड सारखी सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे अल्पावधीतच एएमटी प्रवाशांच्या पसंतीला उतरली होती. मात्र, आता ही सेवा बंद झाल्याने हजारो प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानीला तोंड द्यावे लागणार आहे.

रिक्षाचावाल्यांचे फावणार
शहरातील अनधिकृत रिक्षांमुळे एएमटीला तोटा सहन करावा लागत असल्याचे ठेकेदार संस्थेकडून वारंवार सांगण्यात येत होते. त्यामुळे रिक्षाचालक व एएमटीमध्ये काही दिवसांपासून शीतयुध्द सुरू होते. आता एएमटी बंद झाल्याने रिक्षावाल्यांचे फावणार आहे, व नागरिकांची पिळवणूकही होणार आहे. ’’ एम. डी. गोसावी, ज्येष्ठ नागरिक, सिव्हील हडको

कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ
एएमटी बंद झाल्याने सुमारे 135 कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. इंदूर , पुणे व भोपाळ येथील कार्यालयात कर्मचार्‍यांना सामावून घेतले जाईल, असे ठेकेदार संस्थेमार्फत सांगण्यात आले आहे. परंतु तेथे जाऊन राहणे न परवडणारे आहे. त्यामुळे आमच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.’’ मतीन पठाण, कंट्रोलर, एएमटी.

निविदा पुन्हा काढाव्या लागणार
ठेकेदार संस्थेने केलेल्या मागण्या महानगरपालिकेने मान्य केल्या नाहीत. त्यातील महत्त्वाची मागणी डिझेल खर्चात महापालिकेने आपला वाटा उचलण्याची होती. हे मान्य न झाल्यामुळे ठेकेदारसंस्थेने एक दिवस अगोदर सेवा बंद केली. नवीन सेवा सुरू करण्यासाठी महापालिकेला बससेवच्या निविदा पुन्हा काढाव्या लागणार आहे. दरम्यान, महापौर शीला शिंदे यांनी बससेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.