आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ मिळाला नगर जिल्ह्याला, पालकमंत्री शिंदे यांचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यशासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा सर्वाधिक लाभ नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर कर्जमाफीमुळे फुललेला आनंद कोणत्याही आनंदापेक्षा मोठा आहे, असे प्रतिपादन राज्याचे मृद जलसंधारण, राजशिष्टाचार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग कल्याण तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. मात्र, जिल्ह्यातील नेमक्या किती शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, याची नेमकी माहिती त्यांना देता आली नाही. 
 
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात संपूर्ण राज्यभर बेबाक प्रमाणपत्र वितरण केले. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयालयात पालकमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात बेबाक प्रमाणपत्रे प्रदान केली. त्यावेळी ते बोलत होते. 
 
यावेळी खासदार दिलीप गांधी, महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे उपस्थित होते.
 
पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी ही कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जिल्ह्यातील लाख ७६ हजार ८०४ शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. राज्यात सर्वाधिक शेतकरी आपल्या जिल्ह्यातील असल्याने आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले. कोणीही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खात्री आहे. 
 
ऐन दिवाळीत कर्जमाफी देऊन दिवाळीचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलवला आहे. दिवाळीच्या सणात थेट लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यानंतर जे-जे सातबाराधारक शेतकरी आहे, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम, कर्ज पुनर्गठण असे लाभ मिळणार असल्याने सर्वांना काही ना काही लाभ राज्य शासनाच्या या योजनेमुळे मिळणार असल्याचे ते म्हणाले.

 
जिल्ह्यात यंदा तब्बल सरासरीच्या १७० टक्के पाऊस पडला. जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांमुळे जिल्ह्यात पाणीसाठा निर्माण झाला. त्याचा लाभ आता शेतकऱ्यांना होणार आहे, यामुळे शेतकरी अडचणीत येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बेबाक प्रमाणपत्र प्राप्त झालेले शेतकरी आता रब्बी हंगामाचे कर्ज घेण्यासाठीही प्राप्त ठरतील, असे ते म्हणाले. 
 
कर्जमाफीसाठी जिल्हा प्रशासन तसेच सहकार विभागाने प्रचंड कष्ट घेतले. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही रक्कम मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी महाजन, जिल्हा उपनिबंधक दाबशेडे सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन, यासंदर्भात असलेल्या तांत्रिक चुका दुरुस्त करून शेतकऱ्यांची अद्ययावत माहिती राज्य शासनापर्यंत वेळेत पोहोचवली. त्यामुळे आपण शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम देऊ शकणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. 
 
खासदार गांधी यांनीही आपले विचार मांडले. राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या जीवनातील हा आनंदाचा क्षण आहे. बळीराजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी केंद्र राज्य शासनाकडून प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांचा विमा उतरवावा, जेणेकरून आपत्ती काळात पिकाचे नुकसान झाले, तर त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे आवाहन त्यांनी केले. 
 
महापौर सुरेखा कदम आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनीही मनोगत व्यक्त केले. बेबाक प्रमाणपत्र मिळालेले शेतकरी धोंडिराम पालवे यांनी त्यांच्या मनोगतात शासनाचे आभार व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याने मी कर्जमुक्त झालो. आता मी थकबाकी ठेवणार नाही, असे ते म्हणाले. प्रास्ताविकात दाबशेडे यांनी गेल्या चार महिन्यांत कर्जमाफीसंदर्भात राज्य शासनाकडून आलेले आदेश त्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
शेतकरी कर्जमाफी बेबाक प्रमापत्र वाटपाच्या मेळाव्याचे दीपप्रज्वलन करून उद््घाटन करताना पालकमंत्री राम शिंदे. समवेत जिल्हाधिकारी अभय महाजन, महापौर सुरेखा कदम. दुसऱ्या छायाचित्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप करताना पालकमंत्री शिंदे. समवेत खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे. 
 
या शेतकऱ्यांना कर्जमाफी बेबाक प्रमाणपत्रे 
नगरतालुका - मजनुभाई पीर मोहंमद शेख, मधुकर पावलस जाधव, संगमनेर - पाटीलबा पर्वत दिघे, चंद्रभान मुरलीधर हासे, पारनेर - मच्छिंद्र सखाराम पठारे, तुकाराम रामचंद्र अलभर, श्रीगोंदे - पर्वती शिवराम जामले, संतोष तात्या खराडे, कर्जत - संतराम गेणा मोरे, बाजीराव यादव सूर्यवंशी, जामखेड - दत्तात्रय मुरलीधर शेळके, धर्मा बाजीराव लेकुरवाळे, पाथर्डी - धोंडीराम बन्सी पालवे, पोपट धोंडिबा कारखिले, शेवगाव - राम भानुदास सोलाट, अंबादास हरिभाऊ चेडे, नेवासा - नामदेव राजाराम निकम, प्रकाश दिनकर करपे, राहुरी - उल्हास भाऊसाहेब भवर, रवींद्र श्रीराम लगे, श्रीरामपूर : प्रभाकर पेरणे, भीमराज राधाकिस दौंड, राहाता - दिलीप मोहन कापसे, जालिंदर सजन वाणी, कोपरगाव तालुका - सुरेश काशिनाथ लांडगे, त्रिंबक गोपाळ रणशुळ यांना प्रमाणपत्र वाटप केले. 
 
बातम्या आणखी आहेत...