आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोरांच्या पुतळ्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष; फलकांच्या अतिक्रमणांमुळे विद्रुपीकरण, नागरिक घालतात कपडे वाळत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यासमोर वाहने उभी केली जातात. - Divya Marathi
स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यासमोर वाहने उभी केली जातात.
नगर - शहरातील विविध चौकांत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पुतळ्यांभोवती अनधिकृत फलक लावण्यात येत असल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी या प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत. काही ठिकाणी संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपणावर नागरिक कपडे वाळत घालतात. पुतळ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे. महापालिका प्रशासनाने ही अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, अशी मागणी जागरूक नागरिक करत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, पंडित नेहरू अशा अनेक महापुरुषांचे पुतळे शहरात आहेत. मात्र, जयंती पुण्यतिथी वगळता या पुतळ्यांवरील धूळदेखील झटकली जात नाही. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, तर गंभीर आहे. पुतळ्यांभोवती बेकायदा फलक लावण्यात येतात. एकीकडे शाळा, महाविद्यालयांमध्ये या महापुरुषांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते, तर दुसरीकडे याच महापुरुषांच्या पुतळ्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे चित्र विद्यार्थ्यांना पहावे लागते. 

पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे महापालिका प्रशासन सांगते. प्रत्यक्षात मात्र पुतळ्यांच्या सुरक्षेसाठी एकही कर्मचारी उपस्थित नसतो. एखाद्या महापुरुषाच्या पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केली, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. महापालिका प्रशासनाने पुतळ्यांभोवतीची ही अतिक्रमणे तातडीने हटवून त्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. 

माळीवाडा वेशीजवळ मराठा-इंग्रज युद्धाचे स्मारक आहे. ते पाहण्यासाठी परदेशी पर्यटकांचे शिष्टमंडळ येत्या शुक्रवारी नगरला येत आहे. त्यापूर्वी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तेथील गुटख्याच्या टपरीचे अतिक्रमण दूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

नगर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. शहरात अनेक महापुरुषांची समाधीस्थळे स्मारके आहेत. या महापुरुषांच्या कार्याची माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.
 
सिध्दार्थनगरजवळ खिस्ती स्मशानभूमी असून तेथे संतकवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांची समाधी, न्यू आर्टस् महाविद्यालयासमोर करवीरनिवासी छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांची समाधी आहे. त्यांच्या सुशोभीकरणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. या महापुरुषांची समाधीस्थळे सुशोभित करून तेथे पथदिवे लावावेत. माहिती फलकांद्वारे नागरिकांना महापुरुषांच्या कार्याची माहिती द्यावी; अन्यथा कोणतीही पूर्वसूचना देता ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक संजय झिंजे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...