आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांसाठी 409 कोटींचे अंदाजपत्रक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सन 2013-2014 या वर्षासाठी 408.91 कोटींचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांनी शुक्रवारी स्थायी समितीला सादर केले. रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यावर अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे. नगरोत्थान, पाणीपुरवठा, घरकुल, तसेच भुयारी गटार योजनांच्या माध्यमातून शहरविकासाला चालना देण्यात येणार आहे. वृक्षकर, जललाभ, मललाभ व पारगमन या करांत दरवाढ व नव्याने अग्निशमन कर लावण्याचा प्रस्ताव अंदाजपत्रकात आहे.

स्थायी समितीचे सभापती बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायीच्या सभेत आयुक्त कुलकर्णी यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, मुख्य लेखाधिकारी प्रदीप शेलार, प्रभारी उपायुक्त संजीव परशरामी, अर्थ विभागाचे अनिल लोंढे यांच्यासह सर्व खातेप्रमुख व स्थायीचे सदस्य उपस्थित होते. अंदाजपत्रक सादर करताना आयुक्त म्हणाले, नागरी सुविधांचा योग्य दर्जा राखून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, तसेच मनपा निधीतून अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी अंतर्गत सुरू असलेल्या केडगाव व शहर पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतिपथावर असून ती जूनअखेर पूर्ण होतील. नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली रस्त्यांची कामेही वर्षभरात मार्गी लागतील. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर र्शमसाफल्य योजनेची कामेही लवकरच सुरू होणार आहेत. एलईडी व पथदिव्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सावेडी व केडगाव भुयारी गटार प्रकल्प, सावेडीतील नाट्यगृह, शहर स्वच्छता आराखडा, कत्तलखाना आदी कामांचा समावेश अंदाजपत्रकात आहे. नगरकरांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न अंदाजपत्रकात करण्यात आला असल्याचे आयुक्त कुलकर्णी यांनी सांगितले.

सुरूवातीच्या शिलकेसह 408.91 कोटींच्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न 183.67 कोटी, खर्च 137.58 कोटी, तर भांडवली उत्पन्न 196.39 कोटी व खर्च 250.37 कोटी दर्शवण्यात आला आहे. गेल्या वर्षी शहर विकासासाठी शासकीय अनुदानातून शहर स्वच्छता आराखडा, गरिबांसाठी घरकुले, नगरोत्थान, शहर व केडगाव पाणीपुरवठा योजना, अत्याधुनिक कत्तलखाना, नाट्यगृह आदींसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती. आगामी अंदाजपत्रकातही याच कामांसाठी तरतूद आहे. वृक्षकर, जललाभ व मललाभ, तसेच पारगमन करात वाढ करून अग्निशमन कर आकारण्याचा प्रस्ताव आहे.

आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकातील तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी सभा दोन दिवसांसाठी तहकूब करण्यात आली. येत्या सोमवारी सभेचे कामकाज सुरू होईल, असे स्थायीचे सभापती वाकळे यांनी सांगितले.

वर्षभरात करण्यात येणारी महत्त्वाची विकासकामे

सावेडी उपनगरासाठी स्वतंत्र कचरा डेपो व प्रकल्प, शहराजवळील कोल्हेवाडी ग्रामपंचायत हद्दीत आधुनिक कत्तलखाना उभारणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा प्रकल्प पूर्ण करणे, पाणी पुनर्वापर योजनेंतर्गत विळद येथे बॅकवॉशचे वाया जाणार्‍या 5 लाख लिटर पाण्याचा पुनर्वापर करणे, जीआयएसच्या माध्यमातून शहराचे सव्र्हेक्षण करून सर्व मालमत्तांची माहिती संकलित करणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी जुन्या जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर पार्किंग सुविधा उपलब्ध करणे यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.