आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरात एएमटी डेपोसाठीच्या जागेचा तिढा सुटणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहर बससेवेच्या (एएमटी) डेपोसाठी आवश्यक असलेली जागा देण्यास महापालिकेने सहमती दर्शवली. महापालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी व एएमटीचे व्यवस्थापक दीपक मगर यांनी शुक्रवारी शहरातील चार जागांची पाहणी केली. सर्व सुविधा असलेली नालेगाव येथील वारुळाचा मारुती परिसरातील जागा निश्चित होण्याची शक्यता आहे.

आयुक्त कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी एएमटी डेपोच्या जागेसंदर्भात बैठक झाली. शहरातील उपलब्ध असलेल्या जागा यावेळी सूचवण्यात आल्या. दुपारी या जागांची पाहणी करण्यात आली. नालेगाव येथील वारुळाचा मारुती परिसरात एक एकर, नगर-कल्याण रस्त्यावर उड्डाणपुलाच्याखाली, केडगाव येथे कन्या विद्यालयाजवळ 20 गुंठे जागा व सोनेवाडी येथील महावितरणच्या उपकेंद्रासमोरच्या दोन एकर जागेची पाहणी करण्यात आली. एएमटीच्या डेपोसाठी सुमारे पाऊण ते एक एकर जागेची गरज आहे. सोनेवाडी येथे मुबलक जागा असली, तरी हे अंतर जास्त आहे. त्यामुळे वारुळाचा मारुती परिसरातील जागा निश्चित होण्याची शक्यता आहे.

एएमटीची सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेकदा डिझेलची दरवाढ झाली. त्यामुळे शहर बससेवेला दरमहा 60 हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. 23 महिन्यांत सुमारे 75 लाखांचा तोटा झाला. त्यामुळे यापुढे ही सेवा चालवणे अशक्य असल्याचे एएमटी व्यवस्थापनाने स्पष्ट करून तशी मनपाला तशी नोटीस दिली होती. दरम्यान, गुरुवारी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढीच्या प्रस्तावाला 21 जानेवारीपासून परवानगी दिली. त्यामुळे एएमटीचा तोटा काही प्रमाणात कमी होईल.

जागा करार पद्धतीने भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. एएमटी व्यवस्थापनाने जागा निश्चित केल्यानंतर स्थायी समितीसमोर जागेचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. मंजुरी मिळाल्यानंतर उपलब्ध जागा स्वच्छ करून कंपनीच्या ताब्यात देण्यात येईल, असे महापालिकेचे मेकॅनिकल इंजिनियर परिमल निकम यांनी सांगितले.

आमचे पथक पुन्हा एकदा जागेची पाहणी करून तेथील सोयी-सुविधा व अंतराचा विचारात घेणार आहे. एमएमटीचा तोटा कसा कमी करता येईल, याबाबत विचार केला जाईल. तीन दिवसांत जागेचा अहवाल एएमटीच्या पुणे येथील प्रसन्ना पर्पलच्या मुख्य व्यवस्थापनाकडे ऑनलाइन पाठवण्यात येईल. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर जागा निश्चित होईल. व्यवस्थापनाने महापालिकेला सेवा बंद करण्याबाबत नोटीस बजावली असली, तरी मनपाने घेतलेली सकारात्मक भूमिका पाहता योग्य निर्णय घेण्यात येईल. ’’
-दीपक मगर, व्यवस्थापक, एएमटी.