आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी: आमदार राठोड ‘बॅकफूट’वर; युतीची सत्ता हीच जनतेची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीशी छुपी युती केली, असा आरोप करणारे शिवसेनेचे आमदार अनिल राठोड गुरूवारी बॅकफूटवर गेले. युतीची सत्ता हीच नगरकरांची इच्छा आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याने शिवसैनिकांसह विरोधकांच्याही भुवया उंचावल्या. आतापर्यंत भाजपला शिव्या देणार्‍या आमदारांनी अचानक मवाळ भूमिका का घेतली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राठोड यांच्या हस्ते गुरुवारी विशाल गणेश मंदिरात शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. महापौर शीला शिंदे, शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवार व काही अपक्षही आवर्जून उपस्थित होते.
भाजपच्या 11 जागांवरील उमेदवारीमुळे आक्रमक झालेले राठोड गेले चार दिवस भाजप नेत्यांवर तोंडसुख घेत होते. भाजपने राष्ट्रवादीशी युती करून 11 जागांवर उमेदवार आयात केले आहेत. त्यामुळे या जागांवर शिवसेनेचा भाजपशी काहीच संबंध राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. प्रचाराचा नारळ फोडताना राठोड पुन्हा तोंडसुख घेणार अशी चर्चा होती. तथापि, राठोड भाजपच्या विरोधात एकही शब्द बोलले नाहीत. उलट युतीची सत्ता हीच जनतेची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. राठोड यांनी अचानक मवाळ भूमिका का घेतली, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू होती.
राठोड म्हणाले, आता युध्दाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे गाफिल राहून चालणार नाही. विरोधकांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. शहराला शिवसेना-भाजची सत्ता हवी आहे. त्यामुळे कितीही अफवा पसरल्या, तरी युती अभेद्य आहे. काही शुक्राचार्यांना (भाजप पंच कमिटीतील काही सदस्य) बाजूला करावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी युतीचे 36 ते 40 उमेदवार निवडून आणणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी युतीचे नगरसेवक शंभर टक्के काम करतील, असा शब्दही त्यांनी दिला.
विरोधकांना लगावला राठोडांनी टोला
आमदार राठोड यांनी छत्रपतींच्या विचारांनुसार वाटचाल केली आहे, असे फुलसौंदर म्हणू लागताच राठोड यांनी त्यांच्या हातातील माइक घेतला. ‘‘ही विधानसभेची नाही, मनपाची निवडणूक आहे. माझ्याबद्दल बोलू नका,’’ असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला.
शिवसेनेकडून एकच उमेदवार पुरस्कृत
राठोड म्हणाले, सेनेने केवळ प्रभाग 18 मध्ये सचिन जाधव यांना पुरस्कृत केले. इतर 6-7 ठिकाणी उमेदवार पुरस्कृत करण्यात येतील, परंतु त्यांची नावे आता जाहीर करणार नाही. भाजपकडून जेवढे उमेदवार पुरस्कृत करण्यात येतील, त्याच्या दुप्पट आम्ही करू, असे त्यांनी स्पष्ट केले.