आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीकडून ‘दक्षिण’वर अन्याय; पाचपुते सर्मथकांची भावना

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- श्रीगोंदे तालुक्याचे प्रतिनिधीत्व करतानाच जिल्ह्यात आपली छाप निर्माण करणारे बबनराव पाचपुते यांचे आदिवासी विकास मंत्रिपद व त्याचबरोबर पालकमंत्रिपद गेल्याने दक्षिण नगर जिल्हा पोरका झाला आहे. पाचपुतेंचे मंत्रिपद काढून ते मधुकर पिचड यांना देण्यात आल्याने उत्तर नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात यांच्यासह तीन मंत्री झाले आहेत. त्यामुळे सर्व सत्ताकेंद्रे आता उत्तरेकडे सरकल्याची भावना राष्ट्रवादीच्या दक्षिणेकडील नेत्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

पाचपुते यांचे मंत्रिपद जाणार, हे गेल्या काही दिवसांतील घडामोडींनंतर स्पष्ट झाले होते. पिचड यांनी, तर अगस्ती कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आपले मंत्रिपद निश्चित असल्याचे स्पष्ट केले होते. तथापि, मंत्रिमंडळात स्वच्छ चेहरे आणण्यासाठी बदल करणार असल्याचे शरद पवार यांनी सूचित केल्याने पाचपुते सर्मथकांची आशा धुगधुगत होती. मात्र, तसे न झाल्याने ते निराश झाले.

वास्तविक पाचपुतेंवर कोणतेही गैरव्यवहाराचे आरोप झाले नव्हते. आदिवासी विकासमंत्री असताना त्यांनी सर्व कामांसाठी ई-टेंडरिंग सुरू केले. शहरी शाळांत आदिवासी मुलांसाठी आरक्षण, आदिवासी मुलांसाठी इंग्रजी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न, आदिवासींना सौरऊज्रेची साधने पुरवून त्यांचे जंगलावरील अवलंबित्व कमी करणे, आदिवासी मुलींसाठी कन्यादान योजना, तसेच इतरही विविध योजना त्यांनी राबवल्या. त्यांनी राबवलेल्या ई-गव्हर्नन्समुळे आदिवासी विभागातील प्रशासन गतिमान झाल्याचे प्रथमच दिसून आले, असे नमूद करून पाचपुते सर्मथक नेता म्हणाला, स्वच्छ चेहरे मंत्रिमंडळात आणण्याचे निमित्त करून स्वच्छ कारभार असणार्‍या पाचपुतेंनाच दूर करण्यात आले. मात्र, अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, देवदत्त क्षीरसागर यांच्यासारख्या गैरव्यवहारांमुळे प्रतिमा डागाळलेल्या मंत्र्यांना मात्र कायम ठेवण्यात आले, यासारखा दुसरा विरोधाभास नाही.

पाचपुतेंचे मंत्रिपद गेल्यामुळे नगर शहराच्या विकासावरही विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कारण त्यांनी नगर शहरात चांगले लक्ष घातले होते. पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र त्यांच्याच काळात नगरला मिळाले. शहरात अतिक्रमणविरोधी मोहिमेसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शहराजवळ विस्तारित दहा हजार एकरांवर एमआयडीसी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न होता. स्टेशन रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपुलाचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रश्न मार्गी लागण्याच्या स्थितीत होता. आता पाचपुतेंच्या जाण्याने त्याला खीळ बसणार आहे.

पाचपुतेंनी राष्ट्रवादीला भक्कम करण्यासाठी पावले उचलली होती. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. राष्ट्रवादीचे राज्यातील सर्वांत मोठे भवनही पाचपुतेंनीच नगरमध्ये उभारले असल्याचे त्यांचे सर्मथक नमूद करतात. त्यांच्या काळातच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांत राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले. लोकसभेची नगरची जागा राष्ट्रवादीला मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील होते. मंत्रिपद गेल्याने त्यांच्या प्रयत्नांना खीळ बसून विरोधकांना बळ मिळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पाचपुतेंचे मंत्रिपद जाण्याचे त्यांचे घनश्याम शेलारांसारखे पक्षांतर्गत विरोधक सशक्त होणार आहेत. पण, त्यामुळे पक्षांतर्गत कुरघोड्या थांबणार का, हा प्रश्न आहे.

शहराच्या विकासाला खीळ?
उत्तरेकडील तिन्ही मंत्र्यांना नगर शहराच्या विकासात काहीच रस नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. हे मंत्री नगर शहरात फारसे फिरकतही नाहीत. त्यांना फक्त आपले मतांचे गड सुरक्षित ठेवायचे आहेत. त्यामुळे नगर शहराच्या विकासाला खीळ बसणार आहे. पिचड यांना नगर शहराचा विकास तर सोडाच, पण नगर दक्षिणेकडे पक्षवाढीतही काही रस नव्हता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना ते किती वेळा नगर शहरात आले, हे पाहिले तर सर्व स्पष्ट होईल, अशी भावना पाचपुते सर्मथकांनी व्यक्त केली.