आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणी मंडळाने पिळले कंत्राटदाराचे कान..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भिंगार छावणी मंडळाचा वाहन प्रवेशकर वसूल करणार्‍या ओंकारा कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून ट्रकचालकांची लूट होत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या छावणी मंडळ प्रशासनाने नाक्यांची तपासणी करून संबंधित ठेकेदाराला गुरुवारी समज दिली.

प्रवेश कर नाक्यांवर ट्रकचालकांची लूट होत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले. ट्रकचालकांकडून केवळ पंधरा रुपये प्रवेशकर वसूल करण्याचे अधिकार ठेकेदाराला आहेत. मात्र, एका चालकाच्या माथी दहा पावत्या मारून दीडशे रुपये वसूल करण्यात येत होते. वसुलीचा ठेका 2009 पासून औरंगाबादच्या ओंकारा कन्स्ट्रक्शनकडे आहे. छावणी मंडळ व ठेकेदारातील वाद न्यायालयात गेला आहे. तथापि, गेली चार वष्रे हाच ठेकेदार कर वसुली करत आहे. त्यामुळे छावणी मंडळाच्या उत्पन्नात वाढ न होता सुरूवातीला ठरलेले वार्षिक 3 कोटी 56 लाखच मंडळाला मिळत आहेत.

कल्याण-विशाखापट्टणम् राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर, हैदराबाद, बीडकडे जाणारे महत्त्वाचे मार्ग छावणी मंडळाच्या हद्दीतून जातात. त्यामुळे मालवाहू वाहनांची मोठी वर्दळ असते. यात परप्रांतीय वाहनांचा भरणा अधिक आहे. उत्तर भारतातून आलेली वाहने कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडूकडे जाण्यासाठी या रस्त्यांचा वापर करतात. ‘दिव्य मराठी’ने पाहणी केली असता नगरमध्ये सर्वात जास्त त्रास होत असल्याची तक्रार ट्रकचालकांनी केली. छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार सिंह सध्या प्रशिक्षणासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नव्हती. गुरुवारी केलेल्या पाहणीत ट्रकचालकांची लूट सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. आता दहाऐवजी आठ पावत्या देऊन 120 रुपये उकळले जात आहेत.

जकात अधीक्षकांनी घेतली बैठक

पारगमन नाक्यांवरील लूट न थांबल्यास ठेका रद्द करू, तसेच कर्तव्यात कसूर करणार्‍या नाक्यांवरील मनपा कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित करण्यात येईल, असा इशारा आयुक्त विजय कुलकर्णी व महापौर शीला शिंदे यांनी दिला आहे. जकात अधीक्षक अशोक साबळे यांनी गुरूवारी सर्व नाक्यांवरील मनपा कर्मचार्‍यांची बैठक घेतली. नाक्यावरील अनुचित प्रकारांबाबत वरिष्ठांना कळवावे, तसेच नियमापेक्षा जास्त वसुली करणार्‍या ठेकेदाराच्या कर्मचार्‍यां

भिंगार येथील छावणी मंडळाचे मध्यवर्ती कार्यालय.

..अन्यथा कारवाई
"दिव्य मराठी’त आलेल्या वृत्तानंतर तातडीने सोलापूर, जामखेड या अधिक रहदारी असणार्‍या मार्गांवरील प्रवेशकर नाक्यांना भेटी देऊन पाहणी केली. फ्लाईंग स्क्वॉडचे अभियंता, नाक्यांचे व्यवस्थापक यांनी भेट देऊन माहिती घेतली. नियमांपेक्षा अधिकचा प्रवेश कर वसूल करू नये अशी सक्त ताकीद ठेकेदाराला देण्यात आली असून यात कसूर केल्यास कारवाई करू."
-एस. एस. शिरसूळ, कार्यालयीन अधीक्षक, छावणी मंडळ.

गैरप्रकारांची चौकशी होईपर्यंत ठेका स्थगित ठेवा..
ट्रकचालकांच्या प्रतिक्रियांसह हा विषय लावून धरल्याबद्दल ‘दिव्य मराठी’चे आभार. आर्थिक साटेलोटे असल्याने महापालिकेचे पदाधिकारी व प्रशासनात बधिरपणा आला आहे. चालकांच्या भावना त्यामुळेच त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. पारगमन कर व प्रवेश कर वसुलीत होणार्‍या लुटीची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदारांचा ठेका स्थगित ठेवावा. उपमहापौरांनी केलेल्या मौलिक सूचना प्रशासनाने टाळण्यामागे मनपा पदाधिकारी, जकात ठेकेदार व गुंडांनी संगनमत करून केलेल्या घडामोडी कारणीभूत आहेत. त्यामुळेच या लुटीकडे संगनमताने डोळेझाक केली जात आहे. नगरशी हितसंबंध नसणार्‍या ट्रकचालकांची जेवणाची रक्कमही लुबाडली जाते. यातून यातना समजण्याची जाण संबंधितांना नसल्याचे स्पष्ट होते. जळगाव महापालिकेप्रमाणे नगर मनपाची सर्वंकष चौकशी होण्याची आवश्यकता आहे.
- श्याम आसावा, सामाजिक कार्यकर्ते