आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी अजून सोडेनात महापालिकेचे ‘गुलाम’ कर्मचारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- आपल्या घरातील कामे करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी फुकटात राबवण्याचा प्रकार उघड झाला, तरी जिल्हाधिकार्‍यांनी अद्याप या कर्मचार्‍यांना सोडलेले नाही. अजूनही मनपाचे तीन कर्मचारी त्यांच्या बंगल्यातील पालेभाज्यांची शेती व इतर कामांसाठी राबत आहेत. आधुनिक काळातील आयएएस अधिकार्‍यांचा हा एक सरंजामशाहीचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया नागरी कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी व्यक्त केली.

‘दिव्य मराठी’ने गेल्या मंगळवारी (9 जुलै) हा प्रकार उघड केला. त्यात मनपा कर्मचारी एकनाथ गायकवाड जिल्हाधिकार्‍यांनी पाळलेल्या गायीचे दूध काढतानाचे छायाचित्रही प्रसिद्ध केले होते. हा प्रकार उघड झाल्यानंतरही जिल्हाधिकार्‍यांनी हे कर्मचारी तातडीने मुक्त करण्याची गरज होती. मात्र, काहीच झाले नाही, असे दाखवून त्यांनी मनपा कर्मचार्‍यांना आपल्या गुलामीला जुंपणे सुरूच ठेवले.

जिल्हाधिकार्‍यांनी फक्त कोणी आपल्या बंगल्यातील छायाचित्रे काढू नये, म्हणून तेथील सुरक्षा रक्षकांना आत कोणालाही येऊ न देण्याच्या सूचना केल्याची माहिती समजली. गेल्या 17 वर्षांपासून मनपाचे हे कर्मचारी जिल्हाधिकार्‍यांच्या घरची चाकरी करत आहेत. हा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या दादागिरीतून सुरू आहे. मनपा विभागप्रमुखांत या प्रकाराबाबत मोठी नाराजी आहे, पण मनपाचे वरिष्ठ अधिकारीही आपल्या घरी असे मनपाचे कर्मचारी राबवत आहेत. ‘दिव्य मराठी’ने 11 जुलैच्या अंकात तेही उघड केले.

या प्रकरणी निर्णय ज्यांनी घ्यायचा ते सर्वच या प्रकारांत अडकल्याने या कर्मचार्‍यांना त्यांच्या मूळ कामांवर कोणीही जाऊ देत नाही. त्यामुळे महापालिकेच्या कामांवर विपरीत परिणाम झाला आहे.