आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar College Ground Save, Rto Office Shift Other Site. Student On Strike

‘नगर कॉलेजचे मैदान वाचवण्यासाठी आरटीओ कार्यालय अन्यत्र बांधा’

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अहमदनगर कॉलेजमधील खेळांचे मैदान वाचवण्यासाठी अहमदनगर कॉलेज क्रीडांगण बचाव कृती समितीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.
अहमदनगर कॉलेजच्या खेळाच्या मैदानामधोमध उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. चुकीच्या सरकारी निर्णयामुळे भविष्यात त्या ठिकाणी आरटीओ कार्यालय बांधले जाणार असून त्यामुळे एक चांगले प्रशस्त खेळाचे मैदान उद्ध्वस्त होणार आहे. राष्ट्रीय व राज्य क्रीडा धोरण हे नवीन क्रीडांगणाची निर्मिती करून जास्तीत जास्त पदकविजेते खेळाडू निर्माण करण्याचे आहे. मैदानात आरटीओ कार्यालय बांधण्याच्या निर्णयामुळे शासनाचे क्रीडा धोरणच पायदळी तुडवले जाणार आहे.
नगर कॉलेजच्या मैदानाने अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण केले आहेत. परंतु चुकीच्या निर्णयामुळे यापुढे असे पदकविजेते खेळाडू निर्माण होऊ शकणार नाहीत. नगर शहरामधील नागरिक, लहान मुले या मैदानाचा वापर व्यायाम व सरावाकरिता करीत असतात. त्याला या निर्णयामुळे खीळ बसणार आहे. चांगले मैदान उद्ध्वस्त करून भावी पिढय़ांना आपण काय देणार आहोत, असा सवाल विचारण्यात येत आहे. आरटीओ कार्यालय जेथे बांधले जात आहे, तो अत्यंत गजबजलेला व रहदारीचा राज्य महामार्ग असून तेथून रोज हजारो वाहने येत-जात असतात. या रस्त्यावर रहदारीची कोंडी तर कायमची असते. हे कार्यालय येथे झाल्यावर त्यात वाढ होऊन अपघातांचा धोका वाढणार आहे. स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपुलाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. ज्या ठिकाणी हा पूल संपणार आहे, त्या ठिकाणापासून काही अंतरावरच खेळाचे मैदान तोडून आरटीओ कार्यालय बांधले गेल्यास अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. शासनाने मैदानात आरटीओ कार्यालयासाठी सुरू केलेले बांधकाम त्वरित थांबवण्याचे आदेश द्यावेत, तसेच हे कार्यालय इतरत्र बांधावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या उपोषणात कृती समितीचे जॉन्सन शेक्सपियर, राजू देठे, अजय सूर्यवंशी, सुनील व्हेनॉन, संजय आढाव, प्रा. विधाते आदी सहभागी झाले होते.