आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर गुन्हे करणार्‍यांना शिक्षेसाठी कायद्यात बदल करा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- गेल्या काही महिन्यांपासून युवतींवर होणार्‍या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे समाजात निर्भयपणे राहण्याचा हक्क व आत्मविश्वास युवतींनी गमावला आहे. युवतींवर होणार्‍या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने याबाबत जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांना लेखी निवेदन देण्यात आले. अलीकडेच दिल्लीमध्ये एका युवतीवर व मुंबईमध्ये छायाचित्रकार युवतीवर झालेला अत्याचार ही ठळक उदाहरणे आहेत. याशिवाय राज्यातील इतर शहरांत व ग्रामीण भागात युवतींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अनेकदा दहशतीमुळे किंवा बदनामीच्या भीतीने अत्याचारित युवती फिर्याद द्यायला पुढे येत नाहीत. त्यामुळे अशा अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

कायद्यानुसार 18 वर्षांखालील युवकांना अज्ञान समजून माफक शिक्षा मिळते. वास्तविक अलीकडच्या काळात 18 वर्षांखालील युवकांचाही अशा अत्याचाराच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून येत आहे, परंतु कायद्याने त्यांना कमी शिक्षेची तरतूद असल्यामुळे गुन्हेगारांवरील कायद्याचा वचक कमी होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खून, शारीरिक अत्याचार अशा स्वरुपाच्या गंभीर गुन्ह्यांना वयाची र्मयादा न पाहता कठोर शिक्षा होण्यासाठी कायद्यात बदल व सुधारणा करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

जिल्हाधिकार्‍यांशी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा संघटक माधुरी लोंढे, शहर जिल्हा संघटक तृप्ती मगर, सहसंघटक अमृता कोळपकर यांच्यासह प्रियंका जगताप, माधुरी दिवे, श्रेया भालेराव, कविता जगदाळे, श्रद्धा धूत, सायली पाटील आदी सहभागी होत्या.