आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर जिल्‍हा परिषद: विखे पाटील- थाेरातांच्या ‘लढाई’मुळे काँग्रेससमाेर संकट (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्हा परिषदेवर वर्चस्वासाठीची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, भविष्यातील तिचे चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी जिल्हा परिषदेत पुन्हा सत्ता मिळवतील असे अाडाखे बांधले जात असताना कॉंग्रेसचे जिल्ह्यातील मातब्बर नेते राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.
 
आतापर्यंत त्यांच्या पाडापाडीच्या राजकारणाचा इतिहास पाहिला, तर कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. दुसरीकडे राष्ट्रवादी व भाजपला बंडखाेरांचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या स्थितीतही मागील पंचवार्षिकपेक्षा फार मोठा बदल होण्याची शक्यता दिसत नाही. 
 
सध्या जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा विखे व थोरात यांच्यातील वाक्युद्धाची आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांच्यात ‘तह’ झाला होता. त्यानुसार नाशिक पदवीधर निवडणुकीत विखेंनी थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांच्यासाठी प्रचार केला. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील गटबाजीमुळे पुन्हा या दाेन नेत्यांमधील वाद उफाळून अाला.  आश्वी-जोर्वे गट त्यांच्या वादाचे कारण आहे.
 
संगमनेर तालुक्यात कॉंग्रेसची उमेदवारी देताना विखेंनी निष्ठावंतांना डावलल्याची टीका थोरात करत आहेत. हा गट विखेंच्या शिर्डी मतदारसंघात येत असल्याने विखेंना त्यावर आपले वर्चस्व असावे, असे वाटते. पक्षाचे काय होईल ते होवो, पण वैयक्तिक हितसंबंधांना प्राधान्य देण्यातून हा वाद टाेकाला पाेहाेचला अाहे.
 
जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवून आपल्या पत्नी शालिनी विखे यांनाच पुन्हा अध्यक्षा करण्याचा मनसुबा विखेंनी कधीच लपवलेला नाही. सध्या ते, शालिनी विखे व त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी प्रचाराची राळ उडवली आहे. दुसरीकडे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यातील प्रचार सभा अचानक रद्द झाल्याने कार्यकर्त्यांत निराशेचे वातावरण आहे.  

सध्या जिल्ह्यात भाजप ५, कॉंग्रेस ३, राष्ट्रवादी ३ व शिवसेना १ असे आमदारांचे बलाबल आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी हेच आमदारांचे गणित गृहीत धरण्यात येते.  त्यानुसार भाजपला सर्वाधिक ४० हून अधिक जागा मिळतील, असा दावा पालकमंत्री राम शिंदेंनी केला हाेता.  मात्र प्रत्यक्षात बंडखाेरीने ग्रासलेल्या भाजपला पक्षांतर्गत माेठ्या अाव्हानाला सामाेरे जावे लागणार अाहे. निष्ठावंतांना उमेदवारीत डावलल्याचा अाराेप हाेत अाहे, त्यामुळे निवडणुकीतील यशापयशाची जबाबदारी उमेदवारी वाटपाची मुख्य भूमिका असणाऱ्या पालकमंत्री शिंदेंवरच येणार अाहे.
 
गेल्यावेळी भाजपला केवळ सहा जागा मिळाल्या होत्या. त्या दुप्पट झाल्या तरी खूप, असे भाजपचेच नेते खासगीत बोलून दाखवत आहेत. तर सहा जागांवर असलेल्या शिवसेनेेचे संख्याबळ फारसे वाढण्याच्या अाशा नसल्याची स्थिती आहे. 
 
‘राष्ट्रवादी’ प्रचारात अाघाडीवर  
कॉंग्रेस - भाजपमधील अंतर्गत कलहाच्या तुलनेत सध्या राष्ट्रवादीची जिल्ह्यात भक्कम तयारी असल्याचे दिसते. अजित पवार, धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभा झाल्या आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला आहे. त्या तुलनेत इतर पक्षांचे ‘स्टार’ प्रचारक जिल्ह्यात येण्याची अजून  नेते व कार्यकर्त्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. 
बातम्या आणखी आहेत...