आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"ऑक्सिजन'चे अनुदान परत जाऊ देणार नाही, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनवणे यांचे आश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरच्या जिल्हा रुग्णालयात होणारा ऑक्सिजन प्रकल्पाचा निधी यावर्षी कोणत्याही परिस्थितीत परत जाऊ देणार नाही. तसेच, जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णावर कधीही बाहेरून औषधे आणण्याची वेळ येऊ देणार नाही, असे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांनी मंगळवारी अहमदनगर विकास जनसंसद संघटनेच्या पदाधिका-यांना दिले.
‘दिव्य मराठी’ने सोमवारी ‘टक्केवारीत अडकला ऑक्सिजन पुरवठा प्रकल्प’ हे वृत्त प्रसिद्ध केले. त्यात जिल्हा रुग्णालयास सलग दोन वर्षे दोन कोटी ९० लाखांचा निधी मिळूनही ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी काहीही हालचाल झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. औषधांसाठी १ कोटी ६८ लाख मंजूर झाले असताना निधी खर्च न झाल्याचेही ‘दिव्य मराठी’ने उघड केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जनआंदोलनाचे निमंत्रक अर्शद शेख, अशोक सब्बन यांच्यासह सुमारे ७० कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयावर मोर्चाने जाऊन प्रशासनाला जाब विचारला. डॉ. सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. शेख यांनी या प्रकल्पाबाबत जिल्हा रुग्णालयाने हालचाल का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केल्यावर आम्हाला दररोज लागणारे ५० सिलिंडर सरकार पुरवते, अशी सारवासारव डॉ. सोनवणे यांनी केली. त्यावर शेख यांनी २ कोटी ९० लाखांचा निधी काय जिल्हा नियोजन समितीने मूर्ख म्हणून मंजूर केला का, असा सवाल केल्यावर ते गडबडले. सब्बन यांनी ५० सिलिंडर दाखवून ४० ची खरेदी होते, असा आरोप केला. त्यावर डॉ. सोनवणे यांच्याकडे उत्तर नव्हते. मग त्यांनी ऑक्सिजन प्रकल्पासाठी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे सहा महिन्यांपूर्वी तांत्रिक सल्ला मागितल्याची माहिती आंदोलकांना दिली. त्यावर असा एक प्रकल्प नगरच्या एमआयडीसीत सुरू आहे. तेथून ती तासाभरात मिळू शकते. त्यासाठी सहा महिने वाट पाहणे म्हणजे वेळकाढूपणा असल्याचा आंदोलकांचा आरोप होता.

बाहेरची औषधे आणू देणार नाही
एकीकडे औषधांसाठी १ कोटी ६८ लाखांचा निधी असताना तो खर्च होत नाही. दुसरीकडे औषधे शिल्लक नाहीत, असे सांगून रूग्णांना बाहेरून औषधे आणण्यासाठी दबाव आणला जातो, असा आरोप आंदोलकांनी केला. त्यावर हा सर्व निधी खर्च केला जाईल व रुग्णांवर बाहेरून औषधे आणण्याची वेळ येणार नाही, असे आश्वासन डॉ. सोनवणे यांनी दिले.