आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध‍ील महामार्गावरील चौकांच्या रुंदीकरणाची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातून जाणार्‍या महामार्गांवरील सर्व चौकांचे रुंदीकरण करावे, तसेच औरंगाबाद रोडवरील लक्ष्मीनगर चौक ते कोठी चौकापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी पथदिवे बसवावेत, अशी मागणी दरबार फाउंडेशनचे अध्यक्ष व युवा कार्यकर्ते वाजिद जहागीरदार यांनी केली आहे. लवकरात लवकर ही प्रक्रिया झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाढत्या वाहतुकीचा ताण लक्षात घेता महामार्गावरील चांदणी चौक, स्टेट बँक चौक, कोठला परिसरातील राज चेंबर इमारतीसमोरील चौक, नटराज चौक व इतर प्रमुख चौकांचे रुंदीकरण करणे आवश्यक झाले आहे. दिवसभर या चौकांमध्ये वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने लावण्यात आलेली असतात. हा परिसर पूर्वी ‘नो पार्किंग झोन’ घोषित केला होता. या परिसरात पोस्ट ऑफिस, स्टेट बँक, दगडी दवाखाना, विक्रीकर भवन आदी कार्यालये आहेत. त्यामुळे या महामार्गावरुन प्रचंड वाहतूक चालते. स्टेट बँक चौकात भिंगारकडे जाणारी वाहतूक व चौकाशेजारी असलेल्या मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक यामुळे हा चौक नेहमीच गजबजलेला असतो. राज चेंबर परिसरातील चौक तर मृत्यूचा सापळा बनला आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने या चौकात अचानक कोठेही थांबतात. त्यामुळे पायी प्रवास करणार्‍या नागरिकांना जीव मुठीत धरुन रस्ता ओलांडावा लागतो. नटराज चौकातही हाच प्रकार आहे. या चौकांमध्ये दिवसा वाहतूक पोलिस नेमलेले नसतात. त्यामुळे या चौकांचे रुंदीकरण करणे अपरिहार्य झाले आहे.

पथदिवेही बसवा
चांदणी चौक ते औरंगाबाद रोडवरील शेंडीपर्यंत अहोरात्र अवजड वाहतूक चालते. या मार्गावर मध्यभागी पथदिवे आवश्यक आहेत. चांदणी चौक ते नटराज चौकापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. या महामार्गावर रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्यामुळे अवजड वाहने दुभाजकावर आदळून अपघात होतात. महामार्गाच्या मध्यभागी पथदिवे बसवले, तर हे अपघात निश्चितपणे टळतील. महापालिकेने लवकरात लवकर यात लक्ष घालून महामार्गावर पथदिवे बसवावेत; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- वाजिद जहागीरदार, दरबार फाउंडेशन.