आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ahmednagar Iti Corruption Scarb Vehicle Purchase

आयटीआय भष्ट्राचार: भंगारात गाड्या घेतलेले हादरले

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: नगरच्या सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वाहनांच्या विक्रीप्रकरणी प्राचार्य बाळासाहेब ससे यांनी लॉगबुक व हिस्ट्रीशीट नसल्याचा खुलासा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी नाकारला आहे. या सर्व वाहनांची नोंदणी रद्द होऊनही त्या गाड्या पुन्हा रस्त्यावर येऊ न देण्याच्या त्यांच्या इशार्‍यामुळे भंगारात गाड्या घेतलेले हादरले असल्याची माहिती समजली.
आयटीआयमधील प्रशिक्षणासाठी असलेल्या 11 वाहनांची कवडीमोल दराने गेल्यावर्षी विक्री झाली. या वाहनांची आयटीआयच्या नावावरील नोंदणी रद्द करण्यासाठी प्राचार्य ससे यांनी आरटीओला पत्र पाठवून विनंती केली. त्यात त्यांनी संबंधित वाहने फक्त ‘खोलफिटिंग’साठी वापरात असल्याने त्यांचे लॉगबुक ठेवले जात नसल्याचे नमूद केले होते. वास्तविक या सर्व वाहनांचे लॉगबुक व हिस्ट्रीशीट ठेवले जात असल्याची माहिती कर्मचार्‍यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली होती. शिवाय ससे यांनीही ते कबूल केले होते. फक्त आरटीओला पाठवलेल्या पत्रात मात्र ते तसे कबूल करत नव्हते. त्यामुळे ससे यांच्या पहिल्या पत्रातील लॉगबुकचा मुद्दा मान्य न करता पुन्हा त्याबाबत खुलासा मागण्यात आला होता. त्यावर ससे यांनी पु्न्हा पत्राद्वारे तोच राग आळवला. तो मात्र कांबळे यांनी मान्य न करता संबंधित वाहनांचे चासी क्रमांक मागून ही वाहने पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत, याची हमी मागितली.
ससे यांनी सोमवारी काही गाड्यांचे चासी क्रमांक, काही गाड्यांचे लॉगबुक व हिस्ट्रीशीट आरटीओकडे जमा केले. त्यात दोन गाड्यांचे चॅसी क्रमांक, तीन गाड्यांचे लॉगबुक व तीन गाड्यांचे हिस्ट्रीशीट नसल्याची माहिती समजली. आयटीआयच्या नावावरील नोंदणी रद्द झाली की, नव्या नावाने नोंदणी करून वाहने रस्त्यावर आणण्याचा डाव यामुळे उघड झाला आहे. अर्थात कांबळे यांनी यादीतील पहिली सात वाहने जुनी झाल्याने ती पुन्हा रस्त्यावर येणार नाहीत याची काळजी घेण्याचा इशारा आधीच दिला होता. त्यामुळे ज्यांनी ही वाहने घेऊन रस्त्यावर आणण्याचे ठरवले होते, त्यांचा हा मनसुबा फसला आहे. विशेष म्हणजे या यादीतील प्रीमिअर पद्मिनी कार औरंगाबादच्या रस्त्यांवर धावत असल्याची माहिती समजली.