आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर डायरी: कोण जिल्हेदार अन् कोण किल्लेदार...?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मी जिल्हेदार तर विखे-थोरात किल्लेदार,’ असे विधान करून आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुतेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. जिल्हा परिषदेसाठी जसे वातावरण तापतेय तसे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमधील शब्दयुद्धही पेटू लागले आहे. त्यातही काँग्रेसचे नेते कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात एका बाजूने आहेत, तर दुस-या बाजूने पालकमंत्री पाचपुते आहेत. सध्याचे निमित्त जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे असले तरी हा झगडा अहमदनगर जिल्ह्यावर कोणाचे वर्चस्व असावे यासाठीचा आहे.
विखे व थोरात यांच्यामागे मोठी राजकीय परंपरा आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय गडही तसे शाबूत आहेत. पाचपुतेंचे तसे नाही. त्यांच्यामागे कोणतीही राजकीय परंपरा नाही. एकतीस वर्षांपूर्वी सामान्य कुटुंबातून पाचपुते राजकारणात आले. त्या वेळी श्रीगोंदे तालुक्यात ‘प्रस्थापित विरुद्ध विस्थापित’ तसेच ‘साखर विरुद्ध भाकर’ असा नारा देऊन त्यांनी आपला पाया भक्कम केला. माजी आमदार शिवाजीराव नागवडेंशी संघर्ष करीत त्यांनी तालुक्याच्या राजकारणावर आपली मांड ठोकली. पाचपुतेंची राजकीय कला त्यांना सत्तास्थानांकडे घेऊन गेली. प्रस्थापितांविरोधात संघर्ष करीत मोठे झालेले पाचपुते पुढे केव्हा प्रस्थापितांच्या रांगेत जाऊन बसले हे त्यांनाही समजले नसावे. ते स्वत:ला प्रस्थापित समजत नाहीत हा भाग वेगळा. विविध खात्यांच्या मंत्रिपदांबरोबरच त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपदही मिळाले. पण त्यांनी जिल्ह्यावर वर्चस्व गाजवण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. जिल्ह्यातील वजनदार नेत्यांचे उपद्रवमूल्य लक्षात घेऊन पाचपुतेंनी कधीही त्यांच्याशी पंगा घेतला नाही, हा इतिहास आहे. या वेळी प्रथमच त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले आणि प्रस्थापितांच्या भुवया उंचावल्या. ‘कानामागून आले आणि तिखट झाले,’ अशी त्यांच्याबाबत प्रस्थापितांची भावना झाली आहे. त्यात जिल्ह्याच्या प्रशासनावर पकड मिळवण्याबरोबरच राष्ट्रवादीच्या विस्ताराची जबाबदारीही त्यांच्या अंगावर पडली आहे. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यातील बड्या नेत्यांशी खटका उडणे अपरिहार्य झाले आहे. पाचपुतेंच्या पालकमंत्रिपदाच्या काळात नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यात प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादी असाच संघर्ष झाला. त्याचा पोत पाचपुते विरोधात विखे-थोरात असाच होता. आता लगेच या निवडणुकांच्या निमित्ताने संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. पाचपुतेंना त्यांच्याच तालुक्यात घेरण्याची व्यूहरचना विखे-थोरातांची असल्याचे दिसते. श्रीगोंदे तालुक्यातील पाचपुते विरोधकांना ताकद देण्याचे धोरण वरिष्ठ पातळीवरून ठरल्याचे समजते. निर्णय काहीही लागो, पण पाचपुतेंची त्यांच्या तालुक्यात पीछेहाट झाली, तर काँग्रेसच्या वर्तुळात तो मोठा विजय मानला जाणार आहे. मुरब्बी राजकारणी असलेल्या विखे-थोरातांचे तसेच मनसुबे असल्याचे घटनाक्रमातून स्पष्ट होते.